आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sensex Gains Most In Seven Months; Rate sensitives Rally

गुंतवणूकदार 1 लाख कोटींनी श्रीमंत, निफ्टीने शतकासह गाठली 5668 ची पातळी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली- महागाई दराने गाठलेली गेल्या 40 महिन्यांतील नीचांकी पातळी, त्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून वाढलेल्या व्याजदर कपातीच्या आशा यामुळे मंगळवारी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात खरेदीचा धडाका लावला. त्यातच सोने व कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरणीने या खरेदीला आणखी बळ दिले. यामुळे सेन्सेक्सने 387.13 अंकांची गेल्या सात महिन्यातील एका सत्रातील सर्वाधिक कमाई करत 18,744.93 अंकांची पातळी गाठली. निफ्टीने शतक ठोकत 5,688.95 चा स्तर गाठला. शेअर बाजारातील या तेजीने गुंतवणूकदारांच्या श्रीमंतीत लाख कोटी रुपयांची भर पडली.

सकाळच्या सत्रात सेन्सेक्सने चांगली आघाडी घेतली होती. विक्रीच्या दबाबामुळे सेन्सेक्स एकवेळ 18,325.73 या पातळीपर्यंत खाली आला होता. त्यानंतर विदेशी वित्तीय गुंतवणूकदार संस्था (एफआयआय ) सक्रिय झाल्या आणि सेन्सेक्स आलेख चढत गेला. वित्तीय तूट कमी राहण्याचे संकेत तसेच रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपातीची शक्यता लक्षात घेऊन गुंतवणूकदारांनी खरेदीचा जोर वाढवला. त्यामुळे बाजारात तेजीला बळ मिळाले. बँका, ऑटो, भांडवली
वस्तू आणि ऊर्जा क्षेत्रातील समभागांची गुतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली. त्यामुळे सेन्सेक्सने एकाच सत्रात 387 अंकांची झेप घेतली. सप्टेंबर 2012 नंतर एकाच सत्रात झालेली ही सर्वाधिक कमाई आहे.

शेअर बाजारातील 1400 समभाग तेजीत आले. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या श्रीमंतीत 1 लाख कोटी रुपयांची भर पडून संपत्ती 64.24 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. व्याजदर कपातीच्या शक्यतेमुळे आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी , स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी बँक या समभागांची चांगली खरेदी झाली. त्याचप्रमाणे मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा. हीरो मोटोकॉर्प आणि बजाज ऑटो या समभागांनी चांगली कमाई केली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याचा फायदा शेअर बाजारातील तेल आणि नैसर्गिक वायू कंपन्यांच्या समभागांना झाला. ओएनजीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज कंपन्यांना खरेदीत झुकते माप मिळाले.

सोने-चांदी तसेच कच्च्या तेलाच्या सातत्यपूर्ण घसरणीमुळे चालू खात्यातील वित्तीय तूट कमी होण्याची शक्यता आहे. तसेच महागाई अनपेक्षितरीत्या 6 टक्क्यांच्या खाली आल्याने व्याजदर कपातीची शक्यता वाढल्याने बाजारात तेजी आली आहे. :
निधी सारस्वत, वरिष्ठ विश्लेषक, बोनांझा पोर्टफोलिओ

मणप्पुरमची घसरण
सोन्याची झळाळी काळवंडल्याने सोने तारण कंपन्या तसेच दागिन्यांच्या कंपन्यांच्या शेअर्सची मंगळवारी पुन्हा जोरदार विक्री झाली. मणप्पुरम फायनान्स आणि मुथुट फायनान्स कंपन्यांचे शेअर सुमारे 10 टक्क्यांनी घसरले.

अर्थमंत्र्यांकडून दिलासा
अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी 2016-17 पर्यंत वित्तीय तूट 3 टक्क्यांपर्यंत आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. त्यामुळे गुंतवणूकदारांना, विशेषकरून विदेशी गुंतवणूकदारांना (एफआयआय)दिलासा मिळाला.

तेजीचे मानकरी
मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा, ओएनजीसी, एचडीएफसी, डॉ. रेड्डीज लॅब, हीरो मोटोकॉर्प, एचडीएफसी बँक, एल अँड टी, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, बजाज ऑटो, जिंदाल स्टील, एनटीपीसी, सन फार्मा, हिंदुस्तान युनिलिव्हर, भेल, टाटा पॉवर, भारती एअरटेल, हिंदोल्को, एसबीआय, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा स्टील, गेल.