आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देशांक 20 हजारांकडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीतील कंपन्यांचे भांडवल बाजाराला भावत असलेले आर्थिक निकाल, व्याजदर कपातीची उंचावलेली आशा यामुळे सध्या बाजारात खरेदीचा जोर संचारला आहे. सलग दुस-या दिवशी झालेल्या जोरदार खरेदीत सेन्सेक्सने सकाळच्या सत्रातच 20 हजारी शिखर पार केले. तब्बल दोन वर्षांनंतर 20 हजार अंकांना स्पर्श केल्यानंतर सेन्सेक्स उच्चतम पातळीवरून घसरला व दिवसअखेर 80 अंकांची वाढ नोंदवत 19,986.82 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

सकाळच्या सत्रात 20 हजार अंकांची उडी घेतल्यानंतर कामकाजाच्या अखेरच्या तासात पुन्हा बाजाराचा तापमापक 20 हजारांच्या दिशेने गेला होता, परंतु नंतर मात्र सेन्सेक्स या पातळीवरून घसरून 19,986.82 अंकांच्या पातळीवर बंद झाला. 6 जानेवारी 2011 नंतर म्हणजे जवळपास दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सेन्सेक्सने या जादुई पातळीला स्पर्श केला आहे. राष्‍ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांकही दिवसभरात 6068.50 अंकांच्या कमाल पातळीपर्यंत गेला होता. दिवसअखेर निफ्टीमध्ये 32.55 अंकांची वाढ होऊन तो 6050.60 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

गुंतवणूकदारांनी प्रामुख्याने आयटीसी, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स आणि ओएनजीसी या बड्या समभागांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे सेन्सेक्सला 20 हजारांपर्यंत मजल गाठता आली, परंतु इन्फोसिस, कोल इंडिया लिमिटेड, स्टेट बँक आणि स्टर्लाइट या समभागांचा नफारूपी विक्रीमुळे सेन्सेक्सला 20 हजारांच्या पातळीवर तग धरता येऊ शकली नाही.

बाजारासाठी आणखी एक दिवस भक्कम ठरला आणि सेन्सेक्सने 20000 अंकांची उसळी घेतली. कंपन्यांचे आर्थिक निकाल चांगले लागत असल्याने बाजारातील खरेदीचे वातावरण असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे प्रमुख (पीसीजी रिसर्च) दीपेन शहा म्हणाले.

व्याज संवेदनशील शेअर्सना मागणी
भारतीय रिझर्व्ह बँक 29 जानेवारीला सादर करणार असलेल्या पतधोरण आढाव्यात व्याजदर कपात करण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे बँका, स्थावर मालमत्ता आणि वाहन कंपन्यांच्या समभागांना चांगली मागणी आली.

निकाल चांगले, पण बाजार दिशाहीन
टीसीएस, एचसीएल टेक, अ‍ॅक्सिस बँक या कंपन्यांनी चांगली आर्थिक कामगिरी केल्यामुळे बाजारात तेजीची धारणा होती. परंतु जागतिक बाजारपेठेकडून कोणतीही सकारात्मक दिशा न मिळाल्याने बाजार बंद होताना संमिश्र वातावरण होते. परिणामी त्याचा फायदा भारतीय शेअर बाजाराला होऊ शकला नाही, असे बाजारातील तज्ज्ञांनी मत व्यत केले. वादग्रस्त ठरलेल्या ‘गार’ नियमावलीची अंमलबजावणी दोन वर्षे पुढे ढकलल्याने सोमवारी सेन्सेक्सने 242.77 अंकांची उसळी घेतली होती.

टॉप गेनर्स : आयटीसी, आयसीआयसीआय बँक, टाटा पॉवर, बजाज ऑ टो, टाटा मोटर्स
टॉप लुझर्स : कोल इंडिया, स्टर्लाइट इंडस्ट्रीज, जिंदाल स्टील.