आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंतप्रधानांच्या भाषणानंतर बाजारात उत्साह: सेन्सेक्स तेजीत, रुपया पासष्टीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी अर्थव्यवस्था व रुपयाला सावरण्याचे संकेत शुक्रवारी लोकसभेत दिल्याने बाजारात उत्साह दिसून आला. डॉलरच्या तुलनेत रुपयाने 85 पैशांची कमाई करत 65.70 पर्यंत मजल मारली. सेन्सेक्सने 219 अंकांच्या वाढीसह तेजी टिकवली. सोने 625 रुपयांनी स्वस्त होऊन 31,700 रुपये तोळा झाले. रिझर्व्ह बँकेने बुधवारी रात्री सरकारी तेल कंपन्यांच्या डॉलर खरेदीसाठी एक खिडकी योजना (स्वॅप) सुरू केली. त्यामुळे रुपया सावरण्यास चांगली मदत झाली. गेल्या दोन दिवसांत रुपयाने 310 पैशांची कमाई करत डॉलरची चांगली धुलाई केली. रुपया सावरल्याने शेअर बाजारातही तेजीचे वारे घुमले.


सेन्सेक्स, निफ्टी वधारले
शुक्रवारी शेअर बाजारात तेजी-मंदीच्या सी-सॉचा खेळ चांगलाच रंगला. दिवसअखेर तेजीचे पारडे जड झाले. सेन्सेक्स 218.68 अंकांनी वाढून 18,619.72 वर स्थिरावला. निफ्टीने 62.75 अंकांच्या कमाईसह 5,471.80 पातळी गाठली. बजाज ऑटो आणि सिप्लाच्या समभागांनी तेजीचे नेतृत्व केले. याशिवाय टीसीएस, एचडीएफसी बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि एचडीएफसी यांनीही तेजीला बळ दिले. आरोग्य, बँक, आयटी आणि कंझ्युमर ड्युरेबल्स कंपन्यांच्या समभागांना मागणी होती. सिरियावरील लष्करी हल्ल्याचे संकट तूर्त टळल्यानेही बाजारात सकारात्मक वातावरण आले.


सोने स्वस्त
ज्या डॉलरच्या बळावर सोने तेजीत आले होते ते बळ कमी झाल्याने सोने स्वस्त झाले. शुक्रवारी राजधानीतील सराफा बाजारात सोने तोळ्यामागे 625 रुपयांनी स्वस्त होऊन 31,700 झाले. चांदी किलोमागे 1710 रुपयांनी घटून 54,000 झाली. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने आर्थिक मदतीचा हात आखडता घेण्याचे संकेत दिल्याने जागतिक सराफा बाजारात या दोन्ही मौल्यवान धातूंची चकाकी कमी झाली. मागील दोन दिवसांत सोने 2200 रुपयांनी स्वस्त झाले आहे, तर चांदी किलोमागे 59 हजारांवरून 54 हजारांवर आली.


रुपया सावरून 65.70
रुपया सावरण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वास पंतप्रधांनानी दिल्याने शुक्रवारी रुपया चांगलाच सावरला. डॉलरच्या तुलनेत रुपयाने 85 पैशांची कमाई करत 65.70 पर्यंत मजल मारली. रुपयाला सावरण्यासाठी रिझर्व्ह बँकेने बुधवारी टाकलेल्या पावलांचाही आधार रुपयाला मिळाला. निर्यातदार आणि काही बँकांनी केलेल्या डॉलरच्या विक्रीमुळे रुपयाला चांगले बळ मिळाले.