आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रावणात बरसल्या तेजीच्या धारा, सेन्सेक्समध्ये 124 अंकांनी उसळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रुपयाची घडी नीट बसवण्यासाठी सरकारने आणखी ठोस पावले उचलण्याबाबत उंचावलेल्या अपेक्षा, चीनच्या व्यापारात झालेली सुधारणा अशा काही सकारात्मक गोष्टींमुळे बाजारात खरेदीचे वातावरण पुन्हा एकदा निर्माण झाले. परिणामी गेल्या दोन दिवसांच्या घसरणीनंतर सेन्सेक्सने 124 अंकांची उसळी घेतली.


सकाळपासूनच बाजारात खरेदीचे वातावरण असल्यामुळे सेन्सेक्स 18,687.30 अंकांच्या कमाल पातळीवर उघडला. दिवसभरात 18,621.67 आणि 18,829.26 अंकांच्या पातळीत झुलल्यानंतर सेन्सेक्स दिवसअखेर 124.46 अंकांची वाढ नोंदवत सेन्सेक्स 18,789.34 अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्‍ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक 46.55 अंकांनी वाढून 5565.65 अंकांच्या पातळीवर बंद झाला.


जुलै महिन्यामध्ये व्यापारात अपेक्षेपेक्षा चांगली वाढ झाल्यामुळे चीनच्या आर्थिक कामगिरीत सुधारणा झाली. त्याचप्रमाणे युरोप शेअर बाजारातदेखील तेजी आल्याने जागतिक शेअर बाजारावर त्याचा चांगला परिणाम झाला. या गोष्टींमुळे सेन्सेक्सची चढती कमान कायम राहण्यास मदत झाल्याचे मत बोनान्झा पोर्टफोलिओचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश गोयल यांनी व्यक्त केले. रुपयाच्या मूल्यात झालेली किंचितशी सुधारणा आणि आर्थिक व्यवहारमंत्री अरविंद मायाराम यांनी रुपयाला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकार आणखी काही ठोस उपाययोजना करणार असल्याचे संकेत दिल्याने बाजाराला मोठा दिलासा मिळाला.


ईदनिमित्त आज बाजार बंद
बाजारात झालेल्या खरेदीत धातू, स्थावर मालमत्ता, ऊर्जा आणि वाहन समभागांना मागणी आल्यामुळे क्षेत्रातील निर्देशांकात 1.68 टक्क्यांनी वाढ होऊन तो 2.61 टक्क्यांवर गेला. ‘ईद’ सणानिमित्त शेअर बाजाराचे कामकाज शुक्रवारी बंद राहणार असल्याने या चार दिवसांच्या छोट्या आठवड्याचा शेवट तेजीने झाला हे विशेष.


हे समभाग वधारले
हिंदाल्को, टाटा स्टील, सिप्ला, मारुती सुझुकी, भारती एअरटेल, महिंद्रा अँड महिंद्रा, एचडीएफसी, कोल इंडिया, जिंदाल स्टील, स्टर्लाइट इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, टीसीएस, भेल, हीरो मोटोकॉर्प, टाटा पॉवर