आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजीच्या पतंगाची भरारी, सेन्सेक्स ७२९ अंकांनी उसळून २८ हजारांच्या पार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रिझर्व्ह बँकेकडून अचानक व्याजदर कपातीचा तिळगूळ हाती पडल्यामुळे बाजारात जोरदार खरेदी झाल्यामुळे अनेक समभागांचे पतंग हवेत उंच उडत गेले. स्थावर मालमत्ता बाजारावरील मरगळीची संक्रांत जाऊन गृह खरेदीच्या नव्या पर्वाला आता सुरुवात होण्याच्या अपेक्षेने रिअॅल्टी समभागही तेजाळले आणि सेन्सेक्स ७२८.७३ अंकांची उसळी घेत
२८,०७५.५५ अंकांच्या पातळीवर जाऊन पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीच्या निर्देशांकानेदेखील २१६ अकांची वाढ नोंदवत तो ८४९४.१५ अंकांच्या पातळीवर बंद झाला. गुंतवणूकदारांची मालमत्ता पुन्हा १०० लाख कोटींवर गेल्यामुळे मकर संक्रांत ख-या अर्थाने गोड झाल्याची भावना बाजारातील प्रत्येकाच्या मनात होती.

डाॅलरच्या तुलनेत रुपयाही बळकट झाल्यामुळे खरेदीच्या आनंदात आणखी भर पडून स्थावर मालमत्ता, बँक, भांडवली वस्तू, ऊर्जा, वाहन, तेल आणि वायू समभागांना तुफान मागणी आली. सेन्सेक्सची ७२८.७३ अंकांची कमाई ही ४ मे २००९ नंतरची सर्वात माेठी कमाई आहे. त्या वेळी सेन्सेक्सने ७३१.५० अंकांनी उसळी मारली होती. रिझर्व्ह बँकेने आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी प्रमुख व्याजदरात पाव टक्क्याने कपात करून तो ७.७५ टक्क्यांवर आणण्याचा
निर्णय घेऊन बाजाराला सुखद धक्का दिला. या निर्णयामुळे बाजारालादेखील व्याजदर कमी होण्याचे चक्र सुरू झाल्याचे संकेत मिळाले आहेत, असे मत एचएसबीसी ग्लोबल अॅसेट मॅनेजमेंट इंडियाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी तुषार प्रधान यांनी सांगितले.

१९२ समभागांचा उच्चांक
शेअर बाजारात आलेल्या खरेदीच्या सुनामीत १९२ समभागांनी ५२ आठवड्यांचा उच्चांक नोंदवला. ब्ल्यू-चिप समभागांनी यात आघाडी मिळवली, अॅक्सिस बँक, एचडीएफसी, मारुती सुझुकी, एचडीएफसी बँक, टेक महिंद्रा यांनी वर्षाची उच्च पातळी गाठली. डाबर, फेडरल बँक, जेट एअरवेज, कोटक महिंद्रा बँक, टीव्हीएस मोटर्स, बाटा, बजाज ऑटो या
समभागांनीही आपआपले ५२ आठवड्यांचे उच्चांक नोंदवले. सेन्सेक्सच्या यादीतील ३० पैकी २८ समभाग वधारले, तर हिंदुस्तान युनिलिव्हर आणि हिंदाल्कोचे समभाग घसरले.

व्याजदराशी निगडित शेअर्स उसळले
रिझर्व्ह बँकेने केलेल्या व्याजदर कपातीमुळे व्याजदराशी निगडित कंपन्या, बँकांचे समभाग तेजीने उसळले. या समभागांत १८ टक्क्यांपर्यंत तेजी दिसून आली. रिअॅल्टी तसेच गृहवित्त पुरवठा करणा-या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जास्त तेजी दिसून आली. एचडीएफसी १८.५९ टक्के, तर प्रेस्टीज इस्टेट ११.४६ टक्क्यांनी वधारले. इंडिया बुल्स रिअॅल्टी, डीएलएफ,
युनिटेक आदींना चांगला लाभ झाला.

गुंतवणूकदारांची संपत्ती १०० लाख कोटींवर
मुंबई शेअर बाजारातील जबरदस्त तेजीमुळे गुंतवणूकदारांची संपत्ती पुन्हा एकदा १०० लाख कोटी रुपयांवर पोहोचली. बाजारातील सर्व १२ क्षेत्रीय निर्देशांकांत ०.४४ ते ७.९९ टक्क्यांची वाढ झाली.

व्याजदर कपातीला सलामी
व्याजदर कपातीच्या निर्णयानंतर बाजारात ख-या अर्थाने हुरूप आला. बाजाराला अनुकूल ठरणा-या उपाययोजना आणि बड्या कंपन्यांनी तिमाहीत केलेली चांगली कमाई यामुळे बाजाराच्या आशा आणखी उंचावल्या आहेत. तेल आणि तांब्याच्या दरात झालेल्या सुधारणेमुळे आशियाई बाजारातही तेजीची हवा होती. युरोप शेअर बाजारही चांगल्या स्थितीत
उघडल्यामुळे त्याचाही बाजारावर सकारात्मक परिणाम झाला.

टॉप गेनर्स
एचडीएफसी बँक, स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, एल अँड टी, टाटा पॉवर, रिलायन्स, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती सुझुकी, आयटीसी, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, टाटा माेटर्स, िहंदाल्काे, हिंदुस्तान युनिलिव्हर.