आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स वधारला, रुपया आपटला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विदेशी गुंतवणूकदारांनी खरेदी सुरू ठेवल्याने मंगळवारी सलग दुस-या सत्रात सेन्सेक्सने कमाई केली, तर आयातदारांकडून डॉलरला चांगली मागणी आल्याचा फटका रुपयाला बसून डॉलरच्या तुलनेत रुपया आपटला. रुपयाने 61.88 या पातळीसह आठवड्याचा नीचांक नोंदवला.
तिकडे शेअर बाजारात बँका, वाहन आणि धातू कंपन्यांच्या समभागांना चांगली मागणी आल्याने सेन्सेक्सने 46.07 अंकांच्या वाढीसह 21,251.12 ही पातळी गाठली. निफ्टीने 9.85 अंकांच्या कमाईसह 6313.80 पर्यंत मजल मारली. येत्या 28 तारखेला रिझर्व्ह बँक पतधोरणाचा आढावा घेणार आहे. त्यावेळी प्रमुख व्याजदरात कपात करण्याची आशा गुंतवणूकदारांना आहे. त्यामुळे व्याजदराशी निगडित समभागांच्या खरेदीकडे गुंतवणूकदारांचा कल दिसून आला.
हिंदुस्तान झिंकमधील सरकारचे भांडवल विकण्याच्या निर्णयामुळे धातू समभागांना मागणी आली. हिंदुस्तान झिंक व सेसा स्टरलाइट या समभागांनी 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 15 समभाग वधारले. आशियातील तसेच युरोपातील प्रमुख बाजारात तेजी दिसून आली.
तेजीचे मानकरी :
आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, टाटा स्टील, अ‍ॅक्सिस बँक, सेसा स्टरलाइट, मारुती सुझुकी, लार्सन अँड टुब्रो, एसबीआय,एचडीएफसी बँक.
टॉप लुझर्स : टीसीएस, कोल इंडिया, भेल, गेल इंडिया, सन फार्मा, भारती एअरटेल.
रुपया : आठवड्याचा नीचांक
आयातदारांकडून डॉलरला मोठी मगणी आल्याने मंगळवारी रुपयाचे मूल्य 26 पैशांनी घसरले. डॉलरच्या तुलनेत रुपया 61.88 वर स्थिरावला. रुपयाचा आठवड्याचा नीचांक आहे.