आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्सचा एक महिन्याचा उच्चांक, विदेशी वित्तीय संस्थांकडून समभागांची जोरदार खरेदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विदेशी वित्तीय गुंतवणूकदार संस्थांनी (एफआयआय) जोरदार खरेदी केल्याने शेअर बाजारात तेजी आली. सुधारणांची आशा आणि आतापर्यंत झालेला पाऊस यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह दुणावला. त्यातून झालेल्या खेरदीमुळे सेन्सेक्सने 181.58 अंकांची कमाई करत 19,577.39 हा एक महिन्याचा उच्चांक गाठला. निफ्टीने 56.65 अंकांच्या उसळीसह 5,898.85 ही पातळी गाठली. सोमवारच्या तेजीने गुंतवणूकदारांच्या श्रीमंतीत 90,000 कोटी रुपयांची भर पडली.


सलग तिस-या सत्रात तेजीचा उत्साह अनुभवणा-या बाजारात ब्ल्यूचिप समभागांना चांगली मागणी असल्याचे दिसले. रिलायन्स इंडस्ट्रीज, एल अँड टी आणि मारूतीच्या समभागांची सोमवारी जोरदार खरेदी झाली. त्यातच विदेशी संस्थांनी पुन्हा एकदा समभागांची जोरदार खरेदी करत तेजीला बळ दिले. बांधकाम, ऊर्जा, भांडवली वस्तू, एफएमसीजी, धातूआणि वाहन क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची चांगली खरेदी झाली. इन्फोसिसकडून महसुलाबाबत नकारात्मक संकेत आल्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांनी आपटी खाल्ली.सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 24 समभाग तेजीत राहिले.
ब्रोकर्सनी सांगितले, नौसर्गिक वायुच्या किमतीत वाढ केल्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजसारख्या हेवीवेट समभागांना मागणी आली. ऊर्जा क्षेत्रातील समभागाच्या तेजीने बाजार वधारला. विदेशी संस्थांनी शुक्रवारच्या सत्रात बाजारातून 1124.31 कोटी रुपयांची समभाग खरेदी केली. मागील 13 सत्रापासून विक्री करणा-या या विदेशी गुंतवणूकदारांनी आता खरेदीकडे मोर्चा वळवला असल्याचे दलालांनी सांगितले. आशियातील बाजारात संमिश्र तर युरोपातील बाजारात तेजीचे वातावरण होते.


तेजीचे मानकरी
मारुती सुझुकी, स्टरलाइट इंडस्ट्रीज, गेल इंडिया, एल अँड टी, एसबीआय, टाटा मोटर्स,जिंदाल स्टील, एनटीपीसी, टाटा पॉवर, भेल, टाटा स्टील, रिलायन्स, डॉ. रेड्डीज लॅब, हीरो मोटोकॉर्प