आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्सची तेजीची माळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रिझर्व्ह बँकेने बँक रेटमध्ये कपात करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. बँकांना आता जास्त रोख भांडवल मिळण्याच्या आशा उंचावल्याने शेअर बाजाराने नवरात्रात तेजीची माळ चढवली. सेन्सेक्सने 88.51 अंकांच्या वाढीसह 19,983.61 ही पातळी गाठली. निफ्टी 22.25 अंकांच्या कमाईसह 5,928.40 वर स्थिरावला. इंट्रा-डे व्यवहारात सेन्सेक्सने एक वेळ 20,150 पर्यंत मजल मारली होती. मात्र नंतर झालेल्या विक्रीच्या मा-याने तेजी काहीशी कमी झाली.


रिअ‍ॅल्टी, भांडवली वस्तू आणि एफएमसीजी कंपन्यांचे समभाग या तेजीत चमकले. आयटीसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या समभागांनी सेन्सेक्सच्या तेजीत आणखी भर टाकली. राष्ट्रीय शेअर बाजारातही चांगली खरेदी दिसून आली. त्यामुळे निफ्टीनेही चांगली कमाई केली. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी (एफआयआय) सोमवारी शेअर बाजारातून 494.13 कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली. त्यामुळेही बाजारात सकारात्मक वातावरण होते. सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 14 समभाग वधारले. चीनमधील सकारात्मक औद्योगिक आकडेवारीमुळे आशियातील प्रमुख बाजारांत तेजी दिसून आली.


तेजीचे मानकरी
टाटा पॉवर, भारती एअरटेल, लार्सन अँड टुब्रो, आयसीआयसीआय बँक, आयटीसी.


घसरलेले समभाग
हिंदाल्को, एसबीआय, टाटा स्टील, कोल इंडिया, सेसा गोवा.


रुपया 61.79 वर स्थिर
आयातदारांकडून आलेली मागणी आणि निर्यातदारांकडून झालेला डॉलरचा पुरवठा याचे समीकरण संतुलित राहिल्याने मंगळवारी रुपया काहीच न गमावता व न कमावता 61.79 वर स्थिर राहिला. रिझर्व्ह बँकेने एमएसएफमध्ये केलेल्या कपातीमुळे बाजाराला दिलासा मिळाला.


आरबीआय इफेक्ट
रिझर्व्ह बँकेने व्यापारी बँकांच्या भांडवलाचा ओघ मोकळा केल्याने बाजारात उत्साह दिसून आला. त्यामुळेच निर्देशांक वधारले. तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर आलेली तेजी दिलासादायी आहे.
मिलन बालिशी, रिसर्च हेड, इन्व्हेंचर ग्रोथ