आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोन्याला झळाळी, सेन्सेक्सची उसळी; रूपयाची घसरण सुरूच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली, मुंबई- डॉलरच्या तुलनेत रुपयाने पासष्टी पार करत इंट्रा-डे व्यवहारात 65.46 असा नवा विक्रमी नीचांक नोंदवला. त्यामुळे सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंना चांगली मागणी आली. राजधानीतील सराफा बाजारात सोने तोळ्यामागे 625 रुपयांनी झळाळून 31,750 रुपये झाले. चांदी 1745 रुपयांच्या तेजीसह 51,900 रुपये किलो झाली. रुपयाच्या घसरणीकडे दुर्लक्ष करत शेअर बाजाराने पाच सत्रांनंतर तेजी अनुभवली. सेन्सेक्सने 407.03 अंकांची उसळी घेत 18,312.94 ही पातळी गाठली. निफ्टीने शतक ठोकत 5,408.45 पर्यंत झेप मारली.

चीन व जर्मनीमधील औद्योगिक निर्मिती निर्देशांकाने चांगली कामगिरी केल्याने शेअर बाजारात उत्साह जाणवल्याचे निरीक्षण ब्रोकर्स आणि व्यापा-यांनी नोंदवले. चीनच्या औद्योगिक निर्मितीने सकारात्मक कल लावल्यामुळे देशातील धातू उद्योगाला दिलासा मिळाला. परिणामी धातू विषयक समभागांत मोठी तेजी दिसून आली. हिंदाल्कोच्या समभागांनी सेन्सेक्सच्या तेजीचे नेतृत्व केले. स्टरलाइट इंडस्ट्रीज, टाटा स्टील आणि ओएनजीसी या समभागांनी त्याला साथ दिली. धातू निर्देशांकात 8.23 टक्के वाढ दिसून आली. आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, ओएनजीसी आणि टीसीएस या समभागांनी सेन्सेक्सच्या वाढीत 184.46 अंकांचा वाटा उचलला. सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 28 समभागांत तेजी आली.


सोने झळाळले, चांदी चमकली
नवी दिल्ली । डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण आणि सणांच्या हंगामामुळे आलेली मागणी यामुळे सोने-चांदीत गुरुवारी तेजी आली. राजधानीतील सराफा बाजारात सोने तोळ्यामागे 625 रुपयांनी झळाळून 31,750 रुपये झाले. चांदी 1745 रुपयांच्या तेजीसह 51,900 रुपये किलो झाली. डॉलर आणि पौंडसमोर लोटांगण घेणा-या रुपयामुळे या मौल्यवान धातूंना चकाकी आल्याचे सराफा व्यापा-यांनी सांगितले. सणांचा हंगामामुळे चांगली मागणी आहे.

पासष्टी पार करून रुपया 64.55 वर स्थिरावला
डॉलरच्या तुलनेत गुरुवारी रुपयाने इंट्रा-डे व्यवहारात 65.56 हा आजवरचा नीचांक नोंदवला. नंतर त्यात सुधारणा झाली. दिवसअखेर रुपयाने 44 पैसे गमावत 64.55 ही पातळी गाठली. सरकार आणि रिझर्व्ह बँकेकडून टाकलेल्या पावलांमुळे रुपयाची धुलाई काहीशी कमी झाली.

चीन इफेक्ट
चीनमधील औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी 11 महिन्यांनंतर प्रथमच सकारात्मक आल्याने बाजारात उत्साह आला. विशेषत: धातू कंपन्यांच्या समभागांची जोरदार खरेदी झाली. परिणामी बाजार वधारला.
जयंत मंगलिक, अध्यक्ष (रिटेल), रेलिगेयर सेक्युरिटीज

श्रीमंतीत 1.17 लाख कोटींची वाढ
शेअर बाजारात गुरुवारी आलेल्या 407 अंकांच्या तेजीने गुंतवणूकदारांच्या श्रीमंतीत 1.17 लाख कोटी रुपयांची भर पडली. मागील दोन महिन्यांतील ही सर्वात मोठी तेजी आहे.