आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नफेखोरांनी काटली तेजी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रिलायन्सच्या बायबॅक खरेदीच्या योजनेमुळे या कंपनीच्या समभाग किमतीत चांगली वाढ होऊनही त्याचा फारसा फरक बाजारावर पडला नाही. जागतिक बाजारातील नरमाईच्या वातावरणामुळे बाजारात झालेल्या नफारूपी विक्रीमध्ये सेन्सेक्स किरकोळ 15 अंकांनी घसरून 16,451.47 अंकांच्या पातळीवर बंद झाला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळी चांगल्या पातळीवर उघडला. त्यानंतर तो दिवसभरात 16,517.96 आणि 16,384.48 अंकांच्या पातळीत झुलला. दिवसअखेर सेन्सेक्स 14.58 अंकांनी घसरून 16,451.47 अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्टÑीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांकदेखील 11.50 अंकांनी घसरून 4955.80 अंकांच्या पातळीवर बंद झाला.
भांडवली वस्तू, सार्वजनिक कंपन्या आणि ऊर्जा क्षेत्रातील समभागांवर विक्रीचा ताण आला. रुपयाला बळकटी मिळाल्यामुळे सॉफ्टवेअर निर्यातदार कंपन्यांच्या नफ्याचे प्रमाण आटण्याच्या भीतीने माहिती तंत्रज्ञान समभागांना विक्रीचा फटका बसला. त्यामुळे अग्रणी टीसीएसने मंगळवारी चांगला नफा कमावूनही या कंपनीचा समभाग घसरला.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड सात वर्षांच्या कालावधीनंतर समभाग फेरखरेदीचा विचार करीत आहे. शुक्रवारी होत असलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये या फेरखरेदीच्या प्रस्तावावर विचार होऊन त्याला मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई शेअर बाजारात रिलायन्सच्या समभाग किमतीत 4.94 टक्क्यांनी वाढ झाली.
विदेशी गुंतवणूकदार संस्थांच्या समभाग खरेदीचा जोर वाढला असून त्यांनी मंगळवारी 1057.75 कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केल्याचे मुंबई शेअर बाजाराकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीमध्ये नमूद केले आहे. त्याअगोदर एफआयआयने 357.68 कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली होती.
जागतिक शेअर बाजारातील नरमाईमध्ये हाँगकाँग, तैवान, जपान शेअर बाजार सुस्थितीत होते. परंतु सिंगापूर, चीन, दक्षिण कोरियातील शेअर बाजार घसरले. युरोपमधील ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्सचे शेअर बाजार दुपारच्या सत्रानंतर गडगडले.

आर्थिक निकालाकडे लक्ष
रिलायन्सच्या समभाग किमतीत चांगली वाढ होऊनही बाजाराचा मूड फारसा चांगला नव्हता. टीसीएसच्या व्यवस्थापनाने तिसºया तिमाहीतील आर्थिक निकालांच्या वेळी सावध इशारा दिल्यामुळे माहिती तंत्रज्ञान समभागांवर विक्रीचा ताण आला. गुरुवारी बजाज आॅटो आणि एचडीएफसी बँकेचा आर्थिक निकाल जाहीर होणार असल्यामुळे त्यावर बाजाराचा कल अवलंबून असेल.’’
शानू गोयल, संशोधन विश्लेषक, बोनान्झा पोर्टफोलिओ.

टॉप लुझर्स : या समभागांना बसला फटका
टाटा स्टील, कोल इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा, भेल, विप्रो, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एल. अँड टी., एनटीपीसी, टाटा मोटर्स, सिप्ला, गेल इंडिया, स्टर्लाइट, हिंदुस्तान युनिलिव्हर, मारुती सुझुकी.

टॉप गेनर्स
एचडीएफसी, ओएनजीसी, हीरो मोटोकॉर्प, डीएलएफ, स्टेट बँक, एचडीएफसी.