मुंबई - किरकोळ महागाईने घसरण नोंदवल्यानंतर घाऊक महागाईने जानेवारीत सात महिन्यांचा नीचांक नोंदवत 5.05 टक्क्यांची पातळी गाठली. औद्योगिक उत्पादनांची नकारात्मक पातळी आणि नियंत्रणातील महागाई यामुळे रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करण्याची शक्यता दुणावली आहे. त्यामुळेच बाजारात उत्साह दिसून आला. उत्साही गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्याने सेन्सेक्स 173.47 अंकांनी वाढून 20,366.82 वर पोहोचला. निफ्टीने 47.25 अंकांची कमाई करत 6048.35 ही पातळी गाठली. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी बाजारातून गुरुवारी 399.40 कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली. अमेरिकेचे बाजार तेजीसह बंद झाल्याने शुक्रवारी आशियातील बहुतेक बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 21 समभाग वधारले. टाटा मोटर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी आणि इन्फोसिस या समभागांची जोरदार खरेदी झाली. एसबीआयच्या तिमाही निकालांनी बाजाराचा हिरमोड केला.एसबीआयच्या तिमाही नफ्यात घट झाली. त्यामुळे एसबीआयचा समभाग 1.6 टक्क्यांनी घसरला.
सेन्सेक्स 173 अंकांनी वधारला
घटत्या महागाईने व्याजदर कपातीच्या आशा पल्लवित केल्या. त्यामुळे गुंतवणूकदारांनी शुक्रवारी शेअर बाजारात उत्साही खरेदी केली. परिणामी, सेन्सेक्स 173 अंकांनी वधारला. ही या महिन्यातील सर्वात मोठी तेजी आहे. माहिती-तंत्रज्ञान, टेलिकॉम, बँकिंग आणि रिफायनरी कंपन्यांच्या समभागात जोरदार तेजी आली. सोमवारी संसदेत सादर होणा-या लेखानुदानाकडे आता बाजाराची नजर आहे.
तेजीचे मानकरी
टाटा मोटर्स, गेल इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, एनटीपीसी, टीसीएस, विप्रो, टाटा स्टील, टॉप लुझर्स
महागाईचा सुखद धक्का
मुख्य महागाई निर्देशांकाने अपेक्षेपेक्षा जास्त घसरण दर्शवली. लेखानुदान, वित्तीय तूट याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अप्रत्यक्ष करात काही कपात झाल्यास त्याचा फायदा होईल.
दीपेन शहा, रिसर्च हेड, कोटक सिक्युरिटीज