आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sensex, Nifty Hit Record, Banks Surge On Kotak ING Deal

सेन्सेक्स, निफ्टीने गाठला नवा उच्चांक, रचला विक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कोटक महिंद्रा आणि आयएनजी वैश्य या दोन्ही बँकांनी विलीनीकरणाची अधिकृत घोषणा केल्यामुळे बाजारात शुक्रवारी बँकिंग क्षेत्रातल्या या मोठ्या अधिग्रहणाची चर्चा रंगली. त्यामुळे बाजारात कोटक, आयएनजी बरोबरच अन्य बँकांच्या समभागांना मागणी आली. बाजारात झालेल्या जोरदार खरेदीमध्ये सेन्सेक्सने २६७ अंकांची, तर निफ्टीने ७५.४५ अंकांची उसळी मारत दोन्ही निर्देशांकांनी नवी विक्रमी पातळी पादाक्रांत केली.

जागतिक शेअर बाजारातील सकारात्मक वातावरणाची त्यात आणखी भर पडली. त्याच्याच जोडीला संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये केंद्र सरकार आणखी काही आर्थिक सुधारणांची घोषणा करण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पायाभूत क्षेत्राला बळकटी देण्यासाठी कॅबिनेट झटपट मंजुरी देण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे देखील बाजारातील उत्साह दुणावला आहे. डॉलरच्या तुलनेत ६२.६५ रुपये असा गुरुवारी नऊ महिन्यांचा नीचांक गाठल्यानंतर रुपयात पुन्हा थोडी सुधारणा झाल्यामुळेदेखील बाजाराने सुटकेचा नि:श्वास सोडला.

मुंबई शेअर बाजारात बँक समभागांव्यतिरिक्त भांडवली वस्तू, ग्राहकोपयोगी वस्तू, तेल आणि वायू, बहुराष्ट्रीय कंपन्या, वाहन, स्थावर मालमत्ता, ऊर्जा समभागांना शुक्रवारी चांगलीच मागणी आली. सेन्सेक्स दिवसअखेर २६७.०७ अंकांनी वाढून २८,३३४.६३ अशा नव्या विक्रमी पातळीवर बंद झाला. याअगोदर सेन्सेक्सने १७ नोव्हेंबर रोजी नोंदवलेला २८,१७७.८८ अंकांचा विक्रमही मोडून निघाला. मधल्या काळात सेन्सेक्सने २८,३६०.६६ अंकांची नवा विक्रमी उच्चांक गाठला होता. त्याअगोदर १९ नोव्हेंबर रोजीसुद्धा सेन्सेक्सने २८,२९४.०१ अंकांचा विक्रम केला होता. सध्या सेन्सेक्सची ३० हजाराकडे वाटचाल सुरू असल्यामुळे बाजारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. रिलायन्स, हिंदाल्को, सिप्ला, भेल, हीरो मोटोकॉर्प, आयटीसी, एल अँड टी या कंपन्यांसोबतच कोटक महिंद्रा, आयएनजी, अॅक्सिस आणि स्टेट बँकेच्यासमभागांची तुफान खरेदी झाल्यामुळे सेन्सेक्सचा पारा आणखी वर जाण्यात मदत झाली.

बँक समभागांवर गुंतवणूकदारांच्या उड्या
कोटक महिंद्रा बँकेने आयएनजी वैश्य बँक १५ हजार कोटी रुपयांना खरेदी करण्याची अधिकृत घोषणा केली. बँकिंग क्षेत्रातील हे सर्वात मोठे अधिग्रहण समभाग व्यवहाराच्या माध्यमातून होणार आहे. या घोषणेनंतर शुक्रवारी बँक समभागांवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. अन्य बँकांच्याही समभाग मूल्यात चांगली वाढ झाली.

राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक ७५.४५ अंकांनी वाढून तोही ८४७७.३५ अंकांच्या नव्या विक्रमी पातळीवर बंद झाला. निफ्टीनेदेखील १७ नोव्हेंबरला ८४३०.७५ अंकांचा अगोदरचा विक्रम मोडून काढला.

या बँकांच्या समभागांना मागणी
कोटक महिंद्रा बँक (३.६८ %), आयएनजी वैश्य बँक (२ %), अॅक्सिस बँक, स्टेट बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक (१ ते ३ %), अॅक्सिस बँक (४ टक्के), सिटी युनियन बँक, डीसीबी, धनलक्ष्मी बँक, फेडरल बँक, कर्नाटक बँक (२ ते ५ %).