आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - डिझेलचे दर ठरवण्याबाबत सरकारने गुरुवारी तेल कंपन्यांना काही अंशी मुभा दिली. त्याचा सकारात्मक परिणाम शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात दिसून आला. तेल आणि गॅस कंपन्यांच्या समभागांची जोरदार खरेदी झाली. यामुळे सेन्सेक्सला बळ मिळाले. त्यामुळे दोन वर्षांनंतर सेन्सेक्स 20 हजारांवर बंद झाला. विप्रो, रिलायन्स आणि एचडीएफसी या दिग्गज कंपन्यांच्या तिस-या तिमाहीतील चांगल्या कामगिरीचेही बाजाराने स्वागत केले.
सकाळपासूनच बाजारात उत्साहाचे वातावरण होते. 30 कंपन्यांच्या समभागांवर आधारित सेन्सेक्समध्ये दिवसभरात 75.01 अंकांची भर पडत निर्देशांक 20,039.04 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकात 25.20 अंकांची वाढ होऊन तो 6,083.40 अंकांवर बंद झाला. आशिया तसेच युरोपमधील बाजारातील सकारात्मक वातावरणानेही देशातील गुंतवणूकदारांचा उत्साह वाढवला. चीनच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाची दोन वर्षांतील उच्चांकी कामगिरी तसेच अमेरिकेतील देशाअंतर्गत विक्रीने चार वर्षांत प्रथमच बजावलेली चांगली कामगिरी यामुळे या उत्साहात भरच पडली.
बाजारात जोरदार खरेदी झाली. या खरेदीचा सर्वाधिक फायदा सार्वजनिक क्षेत्रातील ओएनजीसी कंपनीला झाला. ओएनजीसीच्या समभागात 7.31 टक्के तेजी दिसून आली. तिस-या तिमाहीतील चांगल्या कामगिरीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स तेजीत होते. रिलायन्सचे समभाग 1.05 टक्क्यांनी वधारले. भारत पेट्रोलियम, इंडियन ऑ इल आणि ऑइल इंडियाच्या समभागात तेजी आली. रिफायनरीशिवाय रिअॅल्टी क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स वधारले. आयटी, तंत्रज्ञान, ऑटो आणि मेटल शेअर्सना नफेखोरीचा फटका बसला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.