आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स लवकरच जाणार 20 हजारांवर..!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतीय शेअर बाजार लवकरच तेजीच्या वारूवर स्वार होईल आणि मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक पुन्हा एकदा 20 हजारचा टप्पा पार करेल, असा अंदाज क्रेडिट सुइस या आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज फर्मने व्यक्त केला. फर्मच्या मते, भारतीय शेअर बाजारात नजीकच्या काळात कसलेही संकट येण्याची चिन्हे नाहीत. सध्या बाजारात सतर्कतेचे वातावरण आहे. मात्र, अशा वातावरणातही गुंतवणूकदारांनी निवडक शेअर्सच्या खरेदीच्या संधी शोधल्या पाहिजेत.

क्रेडिट सुइसच्या मते, भारतीय बाजारात सध्या सतर्क वातावरण आहे. भांडवलाची चणचण आणि मोठय़ा घसरणीची चर्चा रंगत आहे. मात्र, अशा प्रकारचे कसलेही संकट ओढवण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत आकर्षक किमतीत शेअर्सची खरेदी करण्यात खरे शहाणपण आहे. देशातील बाजारात सलग पाच सत्रांत मोठी घसरण दिसून आली आहे. कंपन्यांचे आर्थिक निकाल खराब राहण्याच्या शक्यतेने विदेशी वित्तीय गुंतवणूकदार संस्थांनी (एफआयआय) विक्रीचा धडाका लावला आहे. या सलग पाच सत्रांत एफआयआयने शेअर बाजारातून 904 कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली आहे. यामुळे देशातील गुंतवणूकदारांत घबराट आहे. याच घबराटीतून मंगळवारी सेन्सेक्स 211.30 अंकांनी घसरून 18,226.48 वर बंद झाला. 13 सप्टेंबर 2012 नंतरचा सेन्सेक्सचा हा नीचांक आहे.

क्रेडिट सुइसच्या मते, 2013-14 या काळात कंपन्यांच्या उत्पन्नात 10 टक्के घसरणीची शक्यता आहे. तसेच वित्तीय सेवासारख्या क्षेत्रात मोठे करेक्शन येण्याच्या शक्यतेने व्यापकदृष्ट्या भारतीय बाजार सध्या आकर्षक वाटत नाहीत. मात्र, निवडक शेअर्सची खरेदी फायदेशीर राहील, असा सल्ला क्रेडिट सुइसने दिला आहे.

या समभागांवर लावा डाव
गुंतवणूकदारांनी सध्या एनटीपीसी, कैर्न इंडिया, अंबुजा सिमेंट, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, एचसीएल टेक्नॉलॉजीज तसेच बँक ऑफ बडोदा यांच्या समभागांची खरेदी करावी, असा सल्ला क्रेडिट सुइसने दिला आहे. या निवडक शेअर्सची खरेदी फायद्याची राहील, असे मत क्रेडिट सुइसने आपल्या अंदाजात व्यक्त केले आहे.