आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स, रुपयात घसरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अमेरिका फेडरल रिझर्व्हकडून रोखे खरेदीत कपातीचे संकेत आणि येत्या आठवड्यात जाहीर होणारे महागाई व औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी यामुळे गुंतवणूकदारांनी विक्रीला प्राधान्य दिले. परिणामी बुधवारी सेन्सेक्स, निफ्टी आणि रुपयात घसरण झाली. दोन दिवसांपूर्वी आलेल्या तेजीमुळे काही जणांनी नफा वसुलीकडे लक्ष दिल्यानेही निर्देशांक गडगडले.
मुंबई शेअर बाजारातील 13 पैकी सात क्षेत्रीय निर्देशांक कोसळले. भांडवली वस्तू आणि वाहन क्षेत्रातील समभागांना घसरणीचा फटका बसला. सेन्सेक्स 83.85 अंकांनी घसरून 21,171.41 वर बंद झाला. निफ्टी 23.95 अंकांच्या घसरणीसह 6307.90 वर स्थिरावला. सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी दहा समभाग चमकले, तर सिप्ला स्थिर राहिला. आशियातील प्रमुख शेअर बाजारातही नकारात्मक सूर दिसला. तैवान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, चीन, जपान आणि हाँगकाँग बाजार आपटले.
रुपया घसरून 61.25 वर
गेल्या सहा सत्रांतील रुपयाच्या तेजीला बुधवारी लगाम लागला. डॉलरच्या तुलनेत रुपयाने 21 पैसे गमावत 61.25 ही पातळी गाठली.
दिल्लीत सोने चकाकले
स्टॉकिस्टांकडून जोरदार खरेदी आणि जागतिक सराफा बाजारातील सकारात्मक कल यामुळे सोने तेजीने झळाळले. राजधानीतील सराफ्यात सोने तोळ्यामागे 425 रुपयांनी वाढून 31,150 झाले. चांदीतील तेजीचा रथ बुधवारीही चांगलाच धावला. चांदी किलोमागे 700 रुपयांनी चकाकून 45 हजारांवर पोहोचली. सराफा व्यापा-यांनी सांगितले की, जागतिक स्तरावर कमकुवत झालेला डॉलर, बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांनी मोर्चा पुन्हा मौल्यवान धातूंकडे वळवल्याने सोने चकाकले.