आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टार्गेट 18,000 : निर्देशांकाने गाठला 4 महिन्यांचा उच्चांक, जगभरात तेजी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- स्पेनमधील बॅँकांना आर्थिक सहाय्य मिळण्याबाबत पुन्हा एकदा आशेचा किरण निर्माण झाल्यामुळे जागतिक शेअर बाजारात आलेली तेजी आणि त्यात रुपया आणि कच्च्या तेलाकडून मिळालेला दिलासा बाजारला संजिवनी देणारा ठरला. त्यामुळे सकाळच्या सत्रातील विक्रीचा ताण हलका होऊन भांडवली वस्तू, बहुराष्ट्रीय कंपन्या, वाहन आणिबॅँकांच्या समभागांची जोरदार खरेदी होऊन सेन्सेक्स 226 अंकांची झेप घेत चार महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला.
सोमवारी सेन्सेक्स 129 अंकांनी गडगडल्यामुळे मंगळवारी सकाळीही बाजारात मरगळच होती. विशेष करून चीनच्या निराशाजनक आयात कामगिरीचा परिणाम होऊन आशियाई शेअर बाजार गडगडला. त्यामुळे सकाळच्या सत्रात काहीसा विक्रीचा तणाव जाणवत होता. परंतु स्पेनमधील बॅँकांची आर्थिक प्रकृती सुधारण्यासाठी युरोझोनमधील वित्त मंत्र्यांनी या बॅँकाना मदत करण्यासाठीच्या व्यवहाराला दिलेला देकार त्याचबरोबर वित्तीय तुटीचे लक्ष्य कमी करण्यासाठी स्पेनला आणखी एक वर्षापर्यंत दिलेली मुदतवाढ, ब्रुसेल्समधील नेत्यांनी उचललेली पावले या सगळ्यामुळे जागतिक शेअर बाजारात विशेष करून ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी शेअर बाजार एकदम तेजीत आले.
जागतिक शेअर बाजारात तेजीचे वारे वाहू लागताच दलाल स्ट्रीटवरील मरगळ आपोआप झटकल्या गेली. नंतर झालेल्या तुफान खरेदीमध्ये सेन्सेक्समध्ये 226.37 अंकांची वाढ होऊन तो 17, 675.85 अंकांच्या पातळीवर झाला. 15 मार्चनंतर सेन्सेक्सच्या पातळीने पहिल्यांदाच इतकी मोठी झेप घेतली आहे. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक देखील 70.20 अंकांनी वाढून 5345.35 अंकांच्या पातळीवर बंद झाला.
रुपया, कच्च्या तेलाचाही दिलासा : गेल्या चार सत्रांपासून घसरत असलेला रुपया अखेर थोडाफार सावरला. सोमवारच्या 55.92 रुपयांच्या बंद पातळीच्या तुलनेत मंगळवारी रुपया डॉलरच्या तुलनेत 55.20 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करीत होता. तर दुसºया बाजुला कच्च्या तेलाची किमत देखील घसरून मागे ती प्रती बॅरल 99 डॉलरवर आली. या दोन्ही गोष्टी बाजाराला दिलासा देणाºया होत्या असे मत बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.
बँकांच्या समभागांची कमाई- बॅँका तसेच वित्तीय कंपन्यांचे येत्या तिमाहीतील आर्थिक निकाल चांगले लागण्याची आशा बाजाराला वाटत आहे. त्यामुळेच एचडीएफसी बॅँक, आयसीआयसीआय बॅँक व एचडीएफसी यांच्यासह अन्य बॅँका आणि वित्तीय कंपन्यांंनी चांगली कमाई केली. वाहन उद्योगाच्या या घसरलेल्या कामगिरीचाही बाजारावर नकारात्मक परिणाम झाला. मारुती आणि टाटा मोटर्स यांच्यासह अन्य वाहन कंपन्यांंना फटका बसला.
स्पेनला 37 अब्ज डॉलर्सचे बेलआऊट- दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरील स्पेनच्या बँकांना युरोझोनने 37 अब्ज डॉलर्सची आर्थिक मदत देण्यास सहमती दर्शवली आहे. युरोझोनच्या वित्तमंत्र्यांनी मंगळवारी याची घोषणा केली. दुसरीकडे, हा निधी पुरेसा नसल्याचे विश्लेषकांचे मत आहे. नऊ तासांच्या दीर्घ चर्चेनंतर लँक्झेंबर्गचे पंतप्रधान क्लाऊड जंकर यांनी सांगितले की, स्पेनसाठी औपचारिक सहमती निवदेनावर जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत हस्ताक्षर करण्यात येईल. महिनाअखेरीस स्पेनला 37 अब्ज डॉलर्सची आर्थिक मदत पुरवण्यात येईल.