मुंबई - सोमवारी सकाळच्या सत्रात शेअर बाजारातील तेजीने निर्देशांकांनी नव्या उच्चांकांची नोंद केली. गुंतवणूकदारांनी सतर्क पवित्रा घेत नफा वसुलीवर भर दिल्याने ही तेजी नंतर ओसरली. दिवसअखेर सेन्सेक्स ६.१० अंकांच्या वाढीसह २७,८७४.७३ वर बंद झाला. निफ्टीने मात्र ७.२५ अंकांच्या वाढीसह ८,३४४.२५ ही आजवर सर्वोच्च पातळी गाठली. इंट्रा डे व्यवहारात निफ्टीने ८,३८३.२५ ही सार्वकालीन उच्चांकी व विक्रमी पातळी गाठली होती.
शेअर बाजारात सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी तेजीने सुरुवात झाली. नंतर मात्र गुंतवणूकदारांनी विक्रीचा पवित्रा घेतल्याने ही तेजी काही प्रमाणात ओसरली. आगामी नाणेनिधी आढाव्यात व्याजदर कपात करणार नसल्याचे संकेत रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरांनी दिल्याने गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला. आशियातील प्रमुख बाजारात तेजी दिसून आली. तर युरोपातील बाजारात काही प्रमाणात घसरण दिसून आली.
टॉप गेनर्स
आयटीसी, सन फार्मा, टाटा पॉवर,डॉ. रेड्डीज लॅब, कोल इंडिया, एचयूएल, एचडीएफसी, एनटीपीसी, विप्रो, हीरो मोटोकॉर्प
टॉप लुझर्स
ओएनजीसी, हिंदाल्को, टाटा मोटर्स, लार्सन, अॅक्सिस बँक, सिप्ला, रिलायन्स, आयसीआसीआय बँक
रुपयाला तरतरी : तीन सत्रांतील अवमूल्यन धुऊन काढत रुपयाने सोमवारी डॉलरवर मात केली. डॉलरच्या तुलनेत रुपयाने १२ पैशांची कमाई करत ६१.५० पर्यंत मजल मारली.
सोने, चांदीत घसरण कायम
नवी दिल्ली - दिवाळीपासून सुरू असणारी मौल्यवान धातूंची घसरण सोमवारी कायम राहिली. राजधानी दिल्लीतील सराफ्यात सोने तोळ्यामागे ५५ रुपयांनी घसरून २६,३९५ झाले. जागतिक सराफ्यातील नरमाई आणि ज्वेलर्स व रिटेलर्सकडून घटलेली मागणी याचा फटका सोन्याच्या किमतीला बसला. औद्योगिक क्षेत्रातून घटलेल्या मागणीमुळे चांदी घसरली. चांदी किलोमागे ५० रुपयांनी घटून ३५,५०० झाली.
सराफा व्यापा-यांनी सांगितले, लग्नसराईला आता सुरुवात होणार आहे. तरीही ज्वेलर्स आणि रिटेलर्स यांच्याकडून सोन्याला मागणी नसल्याचा दबाव किमतीवर दिसून आला. जागतिक सराफा बाजारातही सोने तसेच चांदीच्या किमती घसरल्याचा परिणाम देशातील सराफ्यात दिसून आला. सिंगापूर बाजारात सोने औंसमागे (२८.३४ ग्रॅम) ०.८ टक्क्यांनी घसरून ११६८.४८ डॉलर झाले. धनत्रयोदशीला २८ हजारांच्या आसपास असलेल्या सोन्यात तोळ्यामागे २००० रुपयांची घसरण झाली आहे.