आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
घर खरेदी असेल किंवा एखादी जमीन खरेदी करायची असेल तर आपण नेहमी फायद्याच्या बाबी लक्षात घेतो. अशा वेळी अनेक जण घर कोठे आणि केव्हा खरेदी करायचे याबाबत सल्ले देतात. मात्र, मोजकेच लोक घर खरेदी केव्हा टाळावी हे सांगतात. कारण एखादी लहानशी चूकदेखील सर्व आर्थिक नियोजन बिघडवू शकते. घर खरेदी टाळण्याची सात प्रमुख कारणांविषयी...
1. वाईट क्रेडिट स्कोअर : बाजारातील पत कुंडली (क्रेडिट स्कोअर) खराब असेल तर बँका तसेच वित्तीय कंपन्या होम लोन देण्यास नकार देऊ शकतात. बँकेने अंतिम क्षणी कर्जास नकार दिला तर त्यावर केलेल्या खर्चाचा फटका बसू शकतो.त्यामुळे पत कुंडली सुस्थितीत येईपर्यंत घर खरेदी पुढे ढकलावी.
2. अनिश्चित उत्पन्न : आगामी काळातील उत्पन्नाबाबत अनिश्चितता असेल तर घर खरेदी टाळावी. नोकरी अनिश्चित असेल आणि घर खरेदी केल्यास कर्जाच्या हप्त्याचा (ईएमआय) अतिरिक्त दबाव येऊ शकतो. नोकरी गमावल्यास कर्जाची परतफेड अशक्य होते. आपण कर्जसंकटात सापडू शकतो. कर्जाचे हप्ते थकल्यास बँक घर विकून कर्ज वसुली करू शकते.
3. एके ठिकाणी स्थिर नसल्यास : जर तुम्ही एकेठिकाणी स्थिर नसाल आणि वारंवार ठिकाण बदलावे लागत असेल तर प्रॉपर्टी विकण्यात अडचणी येऊ शकतात. घर भाड्याने दिले तरी त्याची निगराणी ठेवण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे जोपर्यंत स्थैर्य लाभत नाही तोपर्यंत घर खरेदी टाळावी.
4. बांधकाम क्षेत्राची स्थिती खराब असेल तर : बांधकाम क्षेत्रात (रिअल इस्टेट) प्रॉपर्टीच्या किमती कमी असताना बिल्डर्स मंदीच्या जाळ्यात असतात. त्यामुळे घराचा ताबा मिळण्यात विलंब होऊ शकतो. अशा स्थितीत नुकसान टाळण्यासाठी परिस्थितीत सुधारणा होईपर्यंत घर खरेदीचा निर्णय लांबणीवर टाकणे योग्य राहील.
5. कर्ज डोक्यावर असेल तर : आधीच डोक्यावर कर्जाचा डोंगर असेल तर नवे कर्ज फेडण्यात अडचणी येऊ शकतात. मासिक उत्पन्नाच्या 50 टक्क्यांहून अधिक ईएमआय असेल तर आर्थिक स्थिती बिघडू शकते.
6. व्याजदर कपातीची शक्यता असेल तर : नजीकच्या काळात व्याजदर कपातीची शक्यता असेल तर थोडे थांबावे. जोपर्यंत व्याजदरात बदल होत नाहीत तोपर्यंत घर खरेदी टाळण्यातच हुशारी आहे. व्याजदरातील अल्प कपात मोठ्या बचतीसाठी कारणीभूत ठरू शकते.
7. जास्त प्रॉपर्टीची खरेदी : काही जण जमीन, घर खरेदीसाठी उतावीळ असतात.अशा वेळी सौद्यातील नकारात्मक बाबींकडे लक्ष जात नाही. अॅग्रीमेंटमधील अटींकडे फारसे लक्ष जात नाही. त्यामुळे नुकसान होणे निश्चित आहे. ज्याबाबत कमी माहिती आहे असे घर, प्रॉपर्टी खरेदी न करणेच योग्य राहील.
लेखक bankbazaar.com चे सीईओ आहेत.
adhil.shetty@dainikbhaskargroup.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.