आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर्स आधारित डेब्ट, ग्रोथ फंड निवृत्तांसाठी गुंतवणूकीचा ‘फंडा’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निवृत्तीधारकांनी आपल्या गुंतवणुकीच्या काही टक्के रक्कम आपली जोखीम क्षमता तपासून शेअर्सऐवजी शेअर्स आधारित म्युच्युअल फंडात गुंतवावी. पुढील चार पाच वर्षांत अतिशय चांगले उत्पन्न त्याद्वारे मला अपेक्षित आहे. शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सन 2008 ला 20 हजार होता आणि सन 2013 ला आत्ता 20 हजार झाला होता. हा वीस हजारी फेरा गेल्या पाच वर्षांपासून पिंगा घालतो आहे. या वीस हजारी सेन्सेक्समध्ये पुष्कळ बदल झाला आहे. सर्वांनाच तो कळेल असा नाही परंतु पुढील चार-पाच वर्षांनी हाच सेन्सेक्स दुप्पट झाल्यास आश्चर्य वाटणार नाही.

वसंतराव गेल्या वर्षी नोकरीतून निवृत्त झाले, त्यांनी त्यांचा प्रॉव्हिडंट फंड बॅँकेच्या मुदत ठेवीत गुंतविला. इतर गुंतवणूक म्युच्युअल फंडाच्या डेब्ट फंडात होती, जी सर्वसामान्यपणे सुरक्षित मानली जाते. थोडफार सोनं घरात आहे, स्वत:च घर आहे परंतु मुलाच्या लग्नानंतर आणि स्वत: आजोबा झाल्याने घर थोडे छोटे वाटते आहे. नवीन मोठे घर घेण्याची गरज आहे, मुलाला वेगळे घर घेताना थोडीफार मदत हवी आहे. याचबरोबर स्वत:चे निवृत्तीचे नियोजन करणेही गरजेचे आहे. कारण, निवृत्तीनंतर पगाराचे उत्पन्न बंद झाल्याने फक्त व्याजाचे आणि इतर गुंतवणुकीतून मिळणा-या लाभांवर जे नियमित उत्पन्न मिळेल त्यावरच सर्व अवलंबून आहे. असे अनेक गुंतवणूकदार निवृत्त झाल्यावर बॅँकेच्या मुदत ठेव अथवा नियमित उत्पन्न देणा-या म्युच्युअल फंडाच्या डेब्ट योजनांवर अवलंबून असतात.


वयाच्या साठीनंतरही हवे नियमित उत्पन्न
वयाच्या साठीनंतर निवृत्त झाल्यावर किमान 15-20 वर्षे नियमित दरमहा उत्पन्न हवे, वाढत्या वयामुळे आरोग्याचा औषध उपचारांचा खर्च वाढता असतो. समाजात आपली लाइफस्टाइल चांगली आहे, हे दाखविण्यासाठी सुद्धा कधीकधी खर्च करावा लागतो. दीर्घायुष्य महागाईमुळे, त्रासदायक वाटते. श्रीमंतांना त्याचे सोयरसुतक नसते परंतु मध्यमवर्गीयांना, नोकरदारवर्गाला स्वयंरोजगार असणा-या निवृत्त व्यक्तींसाठी वाढते वय आणि वाढते खर्च यांचा सुमेळ लावणे कठीण जाते.
वृद्धापकाळात मदत करेल अशी व्यवस्था आपल्या देशात नाही
स्वत:ची बचत आणि वेगवेगळ्या माध्यमातील गुंतवणुकीपासून मिळणारे उत्पन्न यावर संपूर्ण वार्धक्य अवलंबून असते. आता संयुक्त परिवार विभक्त होताहेत. वृद्धांच्या वार्धक्यात त्यांची काठी कोण आणि किती काळ ? हा प्रश्न दिवसेंदिवस संवेदनशील होतो आहे. आयुष्यभर कमावत्या काळात सरकारला वेगवेगळ्या रूपाने करांची मदत करूनही भरलेल्या कराच्या मोबदल्यात सरकार आपणास वृद्धापकाळात मदत करेल अशी व्यवस्था आपल्या देशात नाही, असे खेदाने म्हणावे लागते.


निवृत्त अथवा ज्येष्ठ नागरिक ज्या बॅँकेत मुदत ठेवीत अथवा इतर डेब्ट (ऋण साधनांत) फंडात गुंतविलेल्या पैशांवर म्हणावे तसे उत्पन्न सुटत नाही. आता व्याजाचे दरही कमी कमी होताहेत. दुष्काळात तेरावा महिना असे विचारात घेतल्यास म्युच्युअल फंडाच्या डेब्ट फंडावर लाभांश वाटप कर सरकारने वाढविला आहे. जास्त व्याजावर आयकर, टीडीएस आहे.


वृद्धांनी यापुढे डेब्ट फंडात ग्रोथ फंड हा पर्याय निवडावा
सामान्यत: निवृत्तीच्या जवळपास असणा-या लोकांनी आपल्या कमावत्या काळात जर थोडीफार जोखीम क्षमता असल्यास काही गुंतवणूक शेअर्स किंवा शेअर्स आधारित इक्विटी फंडात करायला हवी. कमी व्याजाचे दर, उत्पन्नावर आयकर आणि लाभांशावरही कर असल्याने वृद्धांना आवडणारे क्षेत्र मुदतठेवी आणि डेब्ट फंड यांचे उत्पन्न कमी झाल्याने इक्विटीमध्ये थोडीफार गुंतवणूक करावी असे नाईलाजाने सांगण्याची वेळ आली आहे. मुदत ठेवी आणि डेब्ट फंड हे महागाईला तोंड देऊ शकत नाही हे सत्य आहे आणि उत्पन्न समाधानकारक नाही. परंतु सुरक्षितता आहे. शेअर्स अथवा शेअर्स आधारित फंडात जोखीम निश्चित आहे. परंतु समोर उत्पन्नाची अनिश्चितता असली तरी उच्च उत्पन्न परतावा शक्य आहे. वृद्धांनी यापुढे डेब्ट फंडात ग्रोथ फंड हा पर्याय निवडावा कारण, उत्पन्न वाढेल आणि वर्षभर गुंतवणूक ठेवल्यानंतर दीर्घकालीन भांडवल करमुक्त योजनेचा लाभ घेता येईल.