आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Share Come Down : Bank , Non Banking Financial Company's Market Value Fall

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेअर्स घसरणीचा परिणाम : बँका, बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांचे बाजारमूल्य आटले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - समभागांचे मूल्य कमी झाल्याचा फटका बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांना बसला आहे. परिणामी चालू आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत भांडवल बाजारात सूचीबद्ध असलेल्या बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांचे बाजारभांडवल या कालावधीत जवळपास 1.43 लाख कोटी रुपयांनी कमी झाल्याचे दिसून आले आहे.


जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत भांडवल बाजारपेठेत एकूण आठ टक्क्यांपेक्षा घसरण झाली; परंतु या कालावधीत बँका आणि बँकेतर वित्तीय कंपन्यांच्या बाजारमूल्यात मात्र सर्वाधिक अंदाजे 14 टक्क्यांनी घट झाली आहे. चालू आर्थिक वर्ष संपण्यासाठी अद्याप दोन दिवस बाकी असले तरी शेअर बाजार आता थेट नवीन आर्थिक वर्षात म्हणजे एक एप्रिलला उघडणार आहे. कारण पुढील दोन दिवस भांडवल बाजारात काम होणार नाही.


सध्याच्या तिमाहीतील शेअर बाजारातील 50 नोंदणीकृत बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या समभागांच्या हालचालींचे विश्लेषण केले असता एक जानेवारी 2013 ते चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत त्यांचे एकूण संकलित बाजारभांडवल जवळपास 1,43,682 कोटी रुपयांनी घसरून ते 10,44,400 कोटी रुपयांवर आले आहे.

बाजारमूल्यातील घसरणीचा सर्वात जास्त फटका सार्वजनिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाला बसला आहे. चालू तिमाहीत स्टेट बँक ऑफ इंडियाचे बाजार भांडवल 23 हजार कोटी रुपयांनी घसरले असून त्यापाठोपाठ एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल अनुक्रमे 13 हजार कोटी रुपये आणि 12 हजार कोटी रुपयांनी घसरले आहे. या तीन महिन्यांच्याच कालावधीत बँकांशी निगडित अनेक घडामोडी घडल्या. त्यात नवीन बँका सुरू करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने अंतिम मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली.


या बँकांना बसला फटका
खासगी बँका : अ‍ॅक्सिस बँक, येस बँक, कर्नाटक बँक
बाजारमूल्यात वाढ झालेली बँक : कोटक महिंद्रा बँक
बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या : आयडीएफसी, रिलायन्स कॅपिटल, एल अँड टी फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस, श्रीराम ट्रान्सपोर्ट, आयएफसीआय, एचडीएफसी, मुथुट फायनान्स, मनप्पुरम फायनान्स.


बाजारमूल्यात लक्षणीय घट झालेल्या सार्वजनिक कंपन्या / बँका : युको बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, इंडियन ओव्हरसीज बँक, अलाहाबाद बँक, एलआयसी हाऊसिंग फायनान्स, युनियन बँक ऑफ इंडिया, रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्प, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन.
राष्‍ट्रीयीकृत बँका :
बँक ऑफ बडोदा, पीएनबी, कॅनरा बँक, आयडीबीआय बँक

स्टिंग ऑपरेशनचा परिणाम
मनी लाँडरिंगसंदर्भात तीन आघाडीच्या बँकांच्या झालेल्या स्टिंग ऑपरेशन प्रकरणाचादेखील बँकांच्या समभागांवर परिणाम झाला. याशिवाय सुवर्ण कर्ज व्यवसायात असलेल्या काही बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांसह काही अन्य कंपन्यांसाठी निर्माण झालेले आर्थिक अडथळे, त्याचबरोबर नवीन बँक परवाना मिळवण्यासाठी अनेक बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांनी दाखवलेले स्वारस्य या सगळ्या घटनांचा परिणामही बाजारावर झाला. परिणामी सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांचे बाजारमूल्य 85 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त घसरले. त्यापाठोपाठ खासगी बँकांचे बाजार भांडवल 33 हजार कोटी रु., बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांचे बाजार भांडवल शेवटच्या तिमाहीत 25 हजार कोटी रुपयांनी आटले आहे.