आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Share Marekt News In Marathi, Divya Marathi, Sensex, Federal Reserve

सेन्सेक्स, निफ्टीचा नवा विक्रम औटघटकेचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सेन्सेक्स आणि निफ्टीने दिवसभराच्या व्यवहारांमध्ये 22 हजारांची पातळी ओलंडून पुन्हा एकदा नवे शिखर सर केले होते; परंतु ते फार काळ तग धरू शकले नाही. काही निवडक बड्या कंपन्यांच्या नफारूपी विक्रीमध्ये अगोदरची सर्व कमाई धुतली गेली.


अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची बैठक तसेच क्रिमिआला रशियन महासंघाचा एक भाग बनवण्याबाबत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे होणारे भाषण या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन बाजारात अतिशय सावध व्यवहार झाले.
मागील आठवड्यात 22 हजारांच्या पातळीला स्पर्श केल्यानंतर मंगळवारी सेन्सेक्सने 22,040.72 अंकांची आणखी एक नवी ऐतिहासिक पातळी गाठली. सेन्सेक्सची मजल कुठपर्यंत जाते याबद्दल बाजाराची उत्सुकता वाढलेली असतानाच अचानक नफारूपी विक्रीचा मारा झाला. परिणामी अगोदरच्या सत्रातील सगळी कमाई धुऊन निघून सेन्सेक्स दिवसअखेर 22.81 अंकांची वाढ नोंदवत 21,832.61 अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्‍ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीच्या निर्देशांकानेदेखील अगोदरची 6562.85 अंकांची पातळी मोडून 6574.95 अंकांची आणखी एक विक्रमी पातळी गाठली; परंतु निफ्टीमध्येही दिवसअखेर 12.45 अंकांची वाढ होऊन तो 6516.65 अंकांच्या पातळीवर बंद झाला.
अमेरिकेत जाहीर झालेली अपेक्षेपेक्षा चांगली आकडेवारी तसेच गोल्डमन सॅक्सने निवडणुकांमुळे समभागांची चांगली कमाई होण्याबाबत सकारात्मक मत व्यक्त केल्यामुळे बाजाराने नवा विक्रम नोंदवल्याचे मत व्हेरासिटी ब्रोकिंग सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख जिग्नेश चौधरी यांनी व्यक्त केले.