Home | Business | Share Market | share market

शेअर बाजारात सप्ताहाचा प्रारंभ खरेदीने

प्रतिनिधी - मुंबई | Update - Jun 07, 2011, 11:51 AM IST

अमेरिकेतील रोजगारवाढीबाबत आलेल्या निराशाजनक अहवालामुळे आशियाई शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा परिणाम सकाळी मुंबई शेअर बाजारावरही झाला होता.

  • share market

    अमेरिकेतील रोजगारवाढीबाबत आलेल्या निराशाजनक अहवालामुळे आशियाई शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा परिणाम सकाळी मुंबई शेअर बाजारावरही झाला होता. व्याजदरातील संभाव्य वाढीमुळे चिंताग्रस्त झालेल्या गुंतवणूकदारांना जागतिक शेअर बाजारात कच्च्या तेलाच्या कमी झालेल्या किमतींमुळे दिलासा मिळाला. या आनंदात गुंतवणूकदारांनी माहिती तंत्रज्ञान आणि बँक समभागांच्या केलेल्या चांगल्या खरेदीमुळे सेन्सेक्समध्ये ४४ अंकांची वाढ झाली.

    गेल्या दोन सत्रांमध्ये २३२ अंकांची घसरण झाल्यानंतर सौदापूर्ती सप्ताहाच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्समध्ये ४३.६३ अंकांची वाढ होऊन तो १८,२५८.४२ अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांकाने दिवसभरात ५४७९.८५ अंकांची नीचांकी पातळी गाठल्यानंतर तो दिवस अखेर ५५३२.०५ अंकांवर बंद झाला.
    अमेरिकेतील रोजगाराच्या आकडेवारीमुळे निराशा झाल्याने हाँगकाँग, सेऊल, तैवान आणि शांघाय शेअर बाजार शुक्रवारी कोसळले होते. या नरमाईमुळे सकाळी बाजारात निरुत्साहाचे वातावरण होते. परंतु जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने चलनवाढीचा ताण काहीसा हलका होईल, अशी आशा गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्यामुळे दुपारच्या सत्रानंतर गुंतवणूकदारांनी खालच्या पातळीवरच खरेदी सुरू केली. त्यामुळे गेल्या दोन सत्रांपासून विक्रीचा मारा सहन केलेल्या आयटी, हेल्थकेअर समभागांची चांगली खरेदी झाली. त्याचबरोबर बँकांच्या समभागांनीही गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले.
    स्वयंपाकाचा गॅस आणि डिझेलच्या किमती वाढवण्याबाबत येत्या ९ जून रोजी बैठक घेण्याचा सरकार विचार करीत आहे. त्यामुळे त्याचा फटका वाहन कंपन्यांच्या समभागांना बसला. मुंबई शेअर बाजारात नोंदणी असलेल्या ११ आॅटो कंपन्यांपैकी ९ कंपन्यांचे समभाग गडगडले. त्याचा जास्त फटका अशोक लेलँड, बजाज आॅटो, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा आणि एक्साइड इंडस्ट्रीज या कंपन्यांना बसला. आशिया शेअर बाजार आणि युरोपमधील निरुत्साहाच्या वातावरणामुळे बाजारातील कमाईला काहीसा ब्रेक लागला.

Trending