आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजाराने साजरा केला तेजीचा व‍ीकेंड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर रघुराम राजन यांनी सूत्रे स्वीकारताच उत्साहाचे भरते आलेल्या शेअर बाजाराने शुक्रवारी तेजीचा वीकेंड साजरा केला. सलग तिस-या दिवशी सेन्सेक्समध्ये वाढ झाली, तर डॉलरच्या तुलनेत रुपयाही ब-यापैकी वधारला.


शुक्रवारी सेन्सेक्स 290.30 अंकांनी वधारून 19,270.06 अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्‍ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 87.45 अंकांनी वाढून 5,680.40 अंकांवर बंद झाला. दिवसभर सेन्सेक्स 18,929.38 ते 19,293.96 अंकांच्या पातळीवर होता. सरतेशेवटी तो 1.53 टक्क्यांची वाढ नोंदवून 19,270.06 अंकांवर बंद झाला.
डॉलरच्या तुलनेत रुपयातील मजबुतीमुळे बँकिंग, भांडवली वस्तू आणि रिफायनरी कंपन्यांच्या शेअर्समध्ये विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) जारेदार खरेदी केली. गेल्या तीन आठवड्यांतील सेन्सेक्सची ही सर्वोच्च पातळी आहे. बँकिंग क्षेत्रातील शेअर्सना गुंतवणुकदारांनी पुन्हा पसंती दिली. आयसीआयसीआय बँक आणि ओएनजीसीमध्ये सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली. सेन्सेक्सने गेल्या दोन सत्रांत 739 अंकांची हनुमान उडी मारलेली आहे. स्टॉक एक्स्चेंजच्या आकडेवारीनुसार विदेशी गुंतवणूकदारांनी गुरुवारी 1 हजार 101.41 कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली होती. साप्ताहिक आधारावर सेन्सेक्समध्ये एकूण 3.49 अंकांची तेजी राहिली. एमसीएक्स-एसएक्सचा एसएक्स 40 निर्देशांक 183.35 अंकांनी वधारून 11,391.56 अंकांवर बंद झाला. आरबीआयचे कठोर पतधोरण ऑक्टोबरमध्ये मागे घेतले जाऊ शकते, असे बार्कलेजच्या अहवालात म्हटले आहे. याचा सकारात्मक परिणाम बाजारावर दिसून आला.


बोनान्झा पोर्टफोलियो लि. वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश गोयल यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर रघुराम राजन यांनी रुपयासह अर्थव्यवस्थेच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्याच्या घोषणा केल्या आहेत. यामुळे गुंतवणुकदारांचा विश्वास बहाल झाला आहे.


दरम्यान, फिक्की संघटनेने आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांना व्याजदर घटवण्याचे साकडे घातले आहे. आर्थिक वृद्धीला चालना आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी आरबीआयने सीआरआर व एसएलआर घटवावा, कॉर्पोरेट बाँड बाजार मजबूत करावा, नव्या बँकांना त्वरित परवाने जारी करणे, रुपया बाँड जारी करणे आदी उपयाययोजना कराव्यात, असे फिक्कीने म्हटले आहे.


ट्रिपल जंप
सेन्सेक्सने 3 दिवसांत 1035 अंकांची वाढ नोंदवली. गुरुवारी 332, शुक्रवारी 412 अंकांनी सेन्सेक्स वधारला


रुपया 65.24 वर
राजन इफेक्ट शुक्रवारीही दिसला. डॉलरच्या तुलनेत रुपया 77 पैशांनी वधारून 65.24 रुपयांवर बंद झाला. दोन आठवड्यातील ही सर्वोच्च पातळी आहे. निर्यातकांकडून डॉलरची विक्री, विदेशात डॉलरमधील घसरण आणि गुंतवणुकीच्या प्रवाहाने रुपयातील तेजीस चांगली मदत झाली.