आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रीच्या मार्‍यात शेअर बाजारात किरकोळ तेजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जागतिक शेअर बाजारांच्या भक्कम स्थितीमुळे मधल्या सत्रात दोन महिन्यांचा उच्चांक सेन्सेक्सने गाठला, परंतु लार्सन अ‍ॅँड टुब्रोच्या पहिल्या तिमाहीतील आर्थिक निकालामुळे नाराज झालेल्या गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीच्या मार्‍यात दिवसअखेर सेन्सेक्स केवळ नऊ अंकांनी वाढून 20,159.12 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

सकाळच्या सत्रात सेन्सेक्स खालच्या पातळीवर उघडला होता. परंतु आशियाई शेअर बाजारातील स्थिरता आणि युरोप शेअर बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे दुपारच्या सत्रात सेन्सेक्स 20,264.90 अंकांच्या कमाल पातळीवर जाऊन पोहोचला. 17 मे रोजीच्या 20,286.12 अंकांच्या कमाल पातळीनंतर जवळपास दोन महिन्यांनी सेन्सेक्स उंचावला होता. परंतु बांधकाम क्षेत्रातील अग्रणी लार्सन अ‍ॅँड टुब्रोच्या पहिल्या तिमाहीतील खराब कामगिरीमुळे बाजाराचा हिरमोड झाला. सेन्सेक्स दिवसअखेर केवळ 9.27 अंकांची वाढ नोंदवत 20,159.12 अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या चार सत्रांत 307.89 अंकांची वाढ झालेल्या सेन्सेक्सला सौदापूर्ती सप्ताहाच्या पहिल्या दिवशी मात्र केवळ नऊ अंकांची वाढ साध्य करता आली. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक 2.60 अंकांनी वाढून 6031.80 अंकांच्या पातळीवर बंद झाला.
लार्सन अ‍ॅँड टुब्रोच्या नफ्यामध्ये 30 जूनअखेर संपलेल्या तिमाहीत 12.46 टक्क्यांनी घट झाली असून महसूल आणि अन्य उत्पन्नातील वाढदेखील घटली आहे.

टॉप गेनर्स
एचडीएफसी, सन फार्मा, महिंद्रा अ‍ॅँड महिंद्रा, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बॅँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, कोल इंडिया, टाटा पॉवर, इन्फोसिस, टाटा मोटर्स


टॉप लुझर्स
एल अ‍ॅँड टी, भेल, टाटा स्टील, ओएनजीसी, डॉ. रेड्डीज लॅब, रिलायन्स.