आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलग दुसर्‍या आठवड्यात निर्देशांकांची घसरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून सातत्याने सुरू असलेला विक्रीचा मारा आणि त्यातच इन्फोसिसच्या चौथ्या तिमाहीतील आर्थिक निकालाने झालेल्या अपेक्षाभंगामुळे सेन्सेक्सने 208 अंकांची डुबकी मारत सलग दुसर्‍या आठवड्यात घसरणीची नोंद केली.

सेबीकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार विदेशी गुंतवणूकदारांनी 12 एप्रिलपर्यंत आठवडाभरात 587.19 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली आहे. गेल्या काही दिवसांपासून विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावल्यामुळे अगोदरच बाजाराच्या चिंता वाढल्या आहेत. त्यातच भांडवल बाजारातील वजनदार कंपनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या इन्फोसिसने चौथ्या तिमाहीत केलेल्या खराब आर्थिक कामगिरीमुळे तर बाजाराला मोठा धक्का बसला.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणार्‍या ‘नॅस्कॉम’ या संस्थेने 2013 - 14 या वर्षात माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या महसुलात 12 ते 13 टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला होता; परंतु इन्फोसिसने मात्र या अंदाजाच्या उलट म्हणजे केवळ 6 ते 10 टक्क्यांची महसूलवाढ यंदाच्या वर्षात होण्याचे केलेले भाकित भांडवल बाजाराला रुचले नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी इन्फोसिसच्या समभागांची तुफान विक्री करून आपली नाराजी व्यक्त केली. परिणामी इन्फोसिसच्या समभागांची किंमत 20 टक्क्यांनी घसरली. गेल्या दहा वर्षांत एखाद्या समभागाने एका दिवसात नोंदवलेली ही मोठी घसरण आहे. त्यातच शेअर बाजाराच्या कामकाजाच्या शेवटच्या टप्प्यात सॉफ्टवेअर सेवांच्या निर्यातीत तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या विप्रोने आपले तीन बिगर माहिती तंत्रज्ञान विभाग एका खासगी कंपनीत वेगळा केल्याचा परिणाम बाजारावर झाला. एकूण काय तर साप्ताहाच्या अखेरच्या दिवशी सर्व माहिती तंत्रज्ञान समभागांची गुंतवणूकदारांनी यथेच्छ धुलाई केली. परिणामी माहिती तंत्रज्ञान निर्देशांक लक्षणीय 10.26 अंकांनी आपटला

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सौदापूर्ती सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी 18,455.80 अंकांच्या काही वरच्या पातळीवर उघडला. त्यानंतर मिळालेल्या खरेदीच्या पाठिंब्यामुळे तो आणखी वाढून 18,599.14 अंकांच्या पातळीवर गेला; परंतु ही पातळी फार काळ तग धरू शकली नाही नंतर सुरू झालेल्या विक्रीच्या मार्‍यात सेन्सेक्स 207.67 अंकांनी घसरून 18,173.31 अंकांच्या सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. गेल्या दोन आठवड्यात सेन्सेक्स तब्बल 593.21 अंकांनी घसरला आहे.