आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Share Market Crashes On Chinese Data And RBI Steps

बाजार गडगडला, बँक समभागांना जबर फटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - चलन विनिमय बाजारात सध्या सुरू असलेल्या चढउतारावर नियंत्रण मिळवण्यासाठी रिझर्व्ह बॅँकेने आणखी कडक उपाययोजना केल्याचा मोठा फटका बँका आणि वित्तीय समभागांना बसला. बाजारात झालेल्या विक्रीच्या मार्‍यात सेन्सेक्स गेल्या सहा दिवसांत पहिल्यांदाच 211.45 अंकांनी घसरला.

रिझर्व्ह बँकेच्या नव्या निर्णयानुसार, मध्यवर्ती बँकेकडे अन्य व्यावसायिक बँकांनी ठेवावयाच्या रोख राखीव प्रमाणात थेट 70 टक्क्यांवरून 99 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. बँकांना चालू बचत खाते, मुदत ठेवींमार्फत जमा केलेल्या एकूण रकमेच्या 4 टक्के रक्कम रिझर्व्ह बँकेकडे ठेवणे बंधनकारक आहे. बँक सप्ताहाअखेरच्या दिवशी एकूण रकमेच्या सरासरी 70 टक्के रिझर्व्ह बँकेकडे ठेवतात. ही मुभा काढून घेत आता या बँकांना दररोज 99 टक्के रक्कम राखण्याची सक्ती करण्यात आली आहे. यामुळे अर्थव्यवस्थेतील दैनंदिन चलनातून 16 हजार कोटी रुपये कमी होणार आहेत.

रिझर्व्ह बँकेच्या या कडक उपाययोजनांमुळे रुपयाला काही प्रमाणात बळकटी मिळालेली असली तरी दुसर्‍या बाजूला त्याचा नकारात्मक परिणाम बाजारावर होऊ लागला आहे. बँकांसाठीच्या कडक भूमिकेचा फटका प्रामुख्याने एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँकेला बसला. केवळ बँकांच्या समभागांमुळे सेन्सेक्स 164 अंकांनी घसरला. परिणामी गुंतवणूकदार बुधवारी 78 हजार कोटी रुपयांनी कंगाल झाले. पहिल्या तिमाहीत 38 अंकांची वाढ नोंदवत 400.84 कोटी रुपयांचा नफा कमावणार्‍या येस बँकेलादेखील मोठी झळ बसली.

मंगळवारी 30 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर गेल्यानंतर बुधवारी सेन्सेक्स 19,994.25 अंकांच्या पातळीवर आला होता. परंतु दिवसअखेर सेन्सेक्स 20,090.68 अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या पाच दिवसांत सेन्सेक्सने 450.90 अंकांची वाढ नोंदवली होती. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांकदेखील 87.30 अंकांनी घसरून 5990.50 अंकांच्या पातळीवर बंद झाला. जागतिक शेअर बाजारातील संमिश्र वातावरण आणि डेरिव्हेटिव्हज व्यवहारांची संपत असलेली मुदत लक्षात घेऊन बाजाराने सावध व्यवहार केले असल्याचे मत बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. चीनच्या खराब उत्पादन कामगिरीचा परिणाम आशियाई शेअर बाजारावर झाला.