आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मार्केट घसरणीला वेसण; सेन्सेक्स 359 अंकांनी घसरला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - व्याजदर कपातीची निराशा पदरी पडूनही जागतिक बाजारातील भक्कम वातावरण आणि भांडवल बाजारात मोठय़ा प्रमाणावर येत असलेल्या विदेशी निधीच्या ओघाने गुंतवणूकदार सुखावले. परिणामी बाजारात झालेल्या चौफेर खरेदीमध्ये सेन्सेक्सने गेल्या तीन आठवड्यातील घसरणीला वेसण घालत 359 अंकांची साप्ताहिक वाढ नोंदवली.
पहिल्या तिमाहीतील पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बॅँकेने प्रमुख व्याजदर आणि सीआरआरमध्ये कोणताही बदल न करता केवळ वैधानिक रोकड सुलभतेचे प्रमाण (एसएलआर) 1 टक्क्याने कमी करून ते 23 टक्क्यांवर आणण्याचा निर्णय घेतला. व्याजदर कमी न झाल्यामुळे बाजारात निराशा आली. अपुर्‍या पावसामुळे देशात दुष्काळ निर्माण होण्याची चिंताही बाजाराला सतावत होती. पण त्याच वेळी युरोझोनचा पेच सुटण्याकडेही बाजाराचे लक्ष लागले होते. युरोझोनला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन र्जमन आणि इटलीतील नेत्यांकडून मिळाल्यामुळे जागतिक शेअर बाजारात तेजी आली. त्यामुळेही बाजाराचा नूर खरेदीमध्ये पलटला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक कमाल 16,919.14 अंकांच्या पातळीवर उघडला आणि तो झेपावत 17,291.99 अंकांच्या पातळीवर गेला. दिवसअखेर सेन्सेक्स 358.74 अंकांनी वाढून 17,197.93 अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स 681.93 अंकांनी घसरला होता. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीच्या निर्देशांकातही 115.85 अंकांची वाढ होऊन 5215.70 अंकांच्या पातळीवर बंद झाला. अगोदरच्या आठवड्यात सेन्सेक्स 217.10 अंकांनी घसरला होता.
बाजारातील खरेदीचा जोर इतका जास्त होता की सर्वच क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये 0.08 अंकांची वाढ झाली. ऊर्जा, भांडवली वस्तू, स्थावर मालत्ता, रिफायनरी, माहिती तंत्रज्ञान, एफएमसीजी आणि सार्वजनिक कंपन्या या क्षेत्रीय निर्देशांकानी खरेदीत आघाडी घेतली. विशेष म्हणजे या खरेदीत रिटेल गुंतवणूकदार सक्रिय झाल्याने मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही अनुक्रमे 3.14 टक्के आणि 2.96 टक्क्यांनी वाढ झाली.
डॉलरच्या समोर गटांगळ्या खात रुपयाने 56 ची पातळी मोडून एका आठवड्यातील नीचांकी पातळीची नोंद केली. परंतु रुपयाच्या अवमूल्यनामुळे माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचा रुपयाच्या मूल्यातील महसूल मात्र वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळेच माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या.