आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारात तेजीचा झाला शिमगा!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशातील खासगी बँकांमध्येदेखील काळा पैसा पांढरा करण्याचे पेव फुटल्याच्या कथित नव्या प्रकरणामुळे गुरुवारी आर्थिक जगतात खळबळ उडाली आहे. त्याचा अर्थातच परिणाम शेअर बाजारावर होऊन व्याजदर कपातीमुळे निर्माण झालेल्या खरेदीच्या उत्साहावर पाणी फेरले. या प्रकरणात कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन सरकारने दिल्यानंतर आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक यांच्यासह अन्य खासगी क्षेत्रांतील बँकांच्या समभागांची तुफान विक्री होऊन सेन्सेक्स 143 अंकांनी घसरला.

व्याजदर कपातीमुळे गुरुवारी 208 अंकांची उसळी घेतल्यानंतर सौदापूर्ती सप्ताहाच्या अखेरच्या दिवशीदेखील सेन्सेक्स स्थिर पातळीवर उघडला आणि तो लवकरच 19,673 अंकांच्या कमाल पातळीवर गेला. पण ते फार काळ टिकू शकले नाही. बँकांच्या नव्या प्रकरणाने संभ्रमित झालेल्या गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर विक्रीचा मारा सुरू केला. परिणामी दिवसअखेर सेन्सेक्स 142.88 अंकांनी घसरून 19,427.56 अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टीदेखील 36.35 अंकांनी घसरून 5872.60 पातळीवर बंद झाला.

वित्तीय सेवा सचिव राजीव टकरू यांनी आरबीआय,मंत्रालय या प्रकरणाबाबत माहिती गोळा करीत आहेत. या प्रकरणात काही तथ्य आढळून आल्यास यातील दोषी व्यक्तींना त्याची किमत मोजावी लागेल, असा इशारा दिला .

विपरीत परिणाम - ‘व्याजदर कपातीच्या आशेमुळे अलीकडे बँकांच्या समभागांनी चांगली कमाई केली होती, परंतु काळा पैसा पांढरा करण्याच्या प्रकरणाची रिझर्व्ह बँक चौकशी होण्याच्या वृत्ताचा गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम झाला.’ - राकेश गोयल, वरिष्ठ उपाध्यक्ष, बोनान्झा पोर्टफोलिओ.