आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्सला 430चा शॉक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दुपटीने वाढलेल्या सोन्याच्या आयातीमुळे वाढलेली व्यापार तूट आणि त्यातून निर्माण झालेली चालू खात्यातील तुटीची चिंता, जागतिक शेअर बाजारातील नरमाई आणि संवेदनशील राजकीय परिस्थिती अशा परिस्थितीत दिशा हरवलेल्या बाजारात तुफान विक्रीचा मारा होऊन सेन्सेक्स 430 अंकांनी गडगडला. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गुंतवणूकदारांची श्रीमंती एक लाख कोटी रुपयांनी घटली. गेल्या 14 महिन्यांतील या सगळ्यात मोठ्या घसरणीने सेन्सेक्सला आठवड्याचा नीचांक गाठायला लावला.

किरकोळ महागाई घसरून 9.4 टक्क्यांवर आल्यामुळे बाजाराला थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला होता. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सुवर्ण क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची चांगली खरेदी सकाळच्या सत्रात झाली होती. सलग चौथ्या महिन्यात निर्यातीत झालेली वाढ सकारात्मक असली तरी दुसर्‍या बाजूला एप्रिल महिन्यात सोन्याची आयात तब्बल 138 टक्क्यांनी वाढल्यामुळे चालू खात्यातील तुटीची चिंता पुन्हा बाजाराला लागली आहे. गेल्या चार सप्ताहांपासून बाजारात सलग तेजी आल्यामुळे समभागांच्या किमती उच्चांकी पातळीला गेल्या आहेत. त्यामुळे उगाच धोका पत्करण्यापेक्षा विक्रीचा मारा करून नफा कमावलेला बरा, असाच विचार गुंतवणूकदारांनी केला. परिणामी दिवसअखेर सेन्सेक्स 430.65 अंकांनी घसरून 19,691.67 या पातळीवर बंद झाला. त्याअगोदर 27 फेब्रुवारीला सेन्सेक्स 478 अंकांनी आपटला होता.
निफ्टीचा निर्देशांकदेखील 126.80 अंकांनी घसरून 5980.45 अंकांवर बंद झाला.

विक्रीच्या तडाख्यात बीएसईचे बाजारभांडवल एक लाख कोटी रुपयांनी घसरून 67.03 लाख कोटी रुपयांवर आले. बाजारात चौफेर झालेल्या विक्रीच्या मार्‍यात सर्व 13 क्षेत्रीय निर्देशांक गडगडले. जवळपास 1,542 समभाग नकारात्मक पातळीत गेले, तर केवळ 808 सर्वाधिक पातळीवर बंद झाले. चलन बाजारात डॉलरचे वजन वाढल्यामुळे आशियाई शेअर बाजारातील नरमाई, सकाळच्या सत्रात युरोप शेअर बाजारात झालेली घसरगुंडी, याचाही मोठा नकारात्मक परिणाम बाजारावर झाला.

हे समभाग आपटले
टाटा स्टील, भारती एअरटेल, टाटा मोटर्स, एल अँड टी, गेल इंडिया, भेल, स्टर्लाइट, बजाज ऑटो, टीसीएस, ओएनजीसी, कोल इंडिया, सिप्ला, विप्रो, हीरो मोटोकॉर्प, मारुती सुझुकी, हिंदाल्को, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, रिलायन्स.