आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - औद्योगिक उत्पादनात झालेली वाढ, प्रमुख महागाईच्या दरात झालेली घट आणि त्यानंतर अचानक निर्माण झालेला बड्या खासगी बँकांचा मनी लाँडरिंग घोटाळा या घटनामुंळे अगोदरच्या आठवड्यातील तेजीनंतर बाजारात चढ-उताराचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातून मंगळवारी जाहीर होणार्या पतधोरणाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेत कलेल्या नफारूपी विक्रीत सेन्सेक्सने 256 अंकांची गटांगळी खाल्ली.
काही खासगी बँका काळा पैसा पांढरा करण्याच्या घोटाळ्यात सहभागी असल्याच्या कथित वृत्तामुळे बाजारात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिणामी सरत्या आठवड्यात आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक यांच्यासह अन्य काही बँकांच्या समभागांनी मोठी आपटी खाल्ली.
औद्योगिक उत्पादनात वाढ होऊनदेखील किरकोळ महागाईत वाढ झाल्यामुळे मंगळवारी रिझर्व्ह बँक व्याजदर कमी करणार का, या चिंतेने बाजार त्रस्त झाला आहे. त्यामुळे वैतागलेल्या गुंतवणूकदारांनी वाहन तसेच स्थावर मालमत्ता या व्याजदर संवेदनशील समभागांची तुफान विक्री करून नफारूपी कमाईवर जास्त भर दिला.
साप्ताहिक आधारावर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 19,679.88 अंकांच्या खालच्या पातळीवर उघडला आणि नंतर तो 19,754.66 आणि 19,179.33 अंकांच्या पातळीमध्ये राहिल्यानंतर दिवसअखेर 255.67 अंकांनी घसरून 19,427.56 अंकांच्या पातळीवर बंद झाला. अगोदरच्या आठवड्यात सेन्सेक्समध्ये 764.71 अंकांची दणदणीत वाढ होऊन यंदाच्या वर्षातील सर्वात मोठी वाढ नोंदवली होती. विशेष म्हणजे गेला महिनाभर सुरू असलेल्या घसरणीलादेखील त्यामुळे लगाम लागला होता. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांकदेखील 73.10 अंकांनी घसरून 5900 अंकांच्या पातळीच्या खाली म्हणजे 5872.60 अंकांच्या पातळीवर बंद झाला.
या आठवड्यात प्रामुख्याने औद्योगिक उत्पादनामध्ये जानेवारी महिन्यात 2.4 टक्क्यांची वाढ झाल्यामुळे बाजाराला काहीसा दिलासा मिळाला, परंतु किरकोळ महागाईचा दर फेब्रुवारी महिन्यात सलग पाच महिन्यांत वाढून तो अगोदरच्या 10.79 टक्क्यांवरून 10.91 टक्क्यांवर गेला. त्याचप्रमाणे घाऊक किमतीवर आधारित मुख्य महागाईचा दर जानेवारी महिन्यातील 6.62 टक्क्यांवरून 6.84 टक्क्यांवर गेला. ठोक महागाई घसरून 4 टक्क्यांवर म्हणजे गेल्या तीन वर्षांतल्या नीचांकी पातळीवर आल्यामुळे येत्या मंगळवारी रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात पाव टक्क्यांनी कपात होण्याची बाजाराची आशा कायम राहण्यास मदत झाली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.