आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुपयाचा सात महिन्यांचा नीचांक, आयातदारांचे नुकसान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सप्टेंबर महिन्यात डॉलरच्या तुलनेत रुपयाची कामगिरी ढासळली आहे. रुपयाला ऑगस्ट २०१३ नंतर प्रथमच असा फटका बसला आहे. रुपया सध्या सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. सप्टेंबरमध्ये रुपयाचे २.१ टक्क्यांनी अवमूल्यन झाले आहे. ऑगस्ट २०१३ मध्ये रुपया ८.८ टक्क्यांनी घसरला होता. फॉरेक्सतज्ज्ञांच्या मते, अल्प कालावधीत रुपया ६२.७० पर्यंत खाली येऊ शकतो.
छोट्या आयातदारांची अडचण : दिल्ली व्यापार महासंघाचे अध्यक्ष देवराज बबेजा यांच्या मते, रुपयाचे अवमूल्यन छोट्या व्यापाऱ्यांसाठी जास्त त्रासदायक ठरणार आहे. कारण मोठ्या कंपन्या डॉलरमध्ये बचत करून रुपयातील अवमूल्यनात आपला नफा वाचवतात. मात्र छोट्या व्यापाऱ्यांना भांडवलाअभावी चालू चलन दरात व्यवहार करावे लागतात. अशात बुकिंग रेट व डिलिव्हरी दरात मोठा फरक पडतो. त्याचा परिणाम थेट व्यापाऱ्यांच्या नफ्यावर होतो.
रुपयाची कक्षा
फॉरेक्सतज्ज्ञ अजय केडिया यांच्या मते, रुपया ६१.९५ ते ६२.३४ च्या पातळीत राहण्याची शक्यता आहे. डॉलर इंडेक्समध्ये वरच्या पातळीवर नफेखोरी होण्याची शक्यता आहे, तर अल्प काळासाठी डॉलरच्या तुलनेत रुपया ६१.८० ते ६५.७० या पातळीत राहण्याची शक्यता आहे.

घसरणीमागची कारणे
अमेरिकेचे चलन डॉलरचा निर्देशांक सातत्याने बळकट होत असल्याने आणि अमेरिकेच्या पतधोरणात बदल न झाल्याने रुपयात घसरणीचा कल आहे. अमेरिकेत तिमाही जीडीपी विकास दर उत्तम राहिला आहे. त्यानंतर तेथे आता व्याजदर वाढण्याची अपेक्षा आहे. अमेरिकेत व्याजदर वाढले तर विदेशी कर्जदारांना जास्त व्याज चुकवावे लागणार आहे. हे गुंतवणूकदार अमेरिकेसारख्या बाजारातून कमी व्याजाने कर्ज घेऊन भारतातसारख्या शेअर बाजारात पैसे लावतात. जून तिमाहीत अमेरिकेची जीडीपी वाढ ४.६ टक्के राहिली. ही वाढ ४.२ टक्के राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.

डॉलर इंडेक्सची कामगिरी
जपानी चलन येनच्या तुलनेत डॉलरचे मूल्य ११० येनपर्यंत पोहोचले आहे. युरोच्या तुलनेत डॉलर २५ महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर आहे. मंगळवारी युरोने १.२५७ डॉलर अशी नीचांकी पातळी गाठली होती. ऑगस्ट २०१३ नंतरची सर्वात नीचांकी पातळी आहे. ऑस्ट्रेलियन डॉलरही ८ महिन्यांच्या नीचांकावर आहे. डॉलर इंडेक्समध्ये एकतर्फी तेजीचा कल दिसतो आहे. मंगळवारी डॉलर इंडेक्स जून २०१० नंतर प्रथमच ८८.२१ या उच्चांकी पातळीत होता. सध्या डॉलर इंडेक्स ८८.०६ च्या आसपास आहे.

अल्पकाळात रुपयात घसरण
फॉरेक्सतज्ज्ञ अजय केडिया यांनी सांगितले, डॉलर मजबूत झाल्यानंतर विकसनशील देशांतील चलनांचे मोठ्या प्रमाणात अवमूल्यन झाले आहे. त्याचा परिणाम रुपयावरही झाला आहे. येत्या आठवड्यात रुपयातील घसरण सुरू राहील. इतर विकसनशील देशांच्या चलनाच्या तुलनेत रुपयाची घसरण कमी झाली आहे. जाणकारांच्या मते, स्टँडर्ड अँड पुअर्सने अलीकडेच भारताचे पतमानांकन स्थिर केले आहे. त्याचाही परिणाम होईल.

तिमाही निकालावर राहील शेअर बाजाराची नजर
मंगळवारपासून सुरू होत असलेल्या सौदापूर्ती सप्ताहामध्ये जागतिक घडामोडी, दुसऱ्या तिमाहीतील कंपन्यांचे निकाल बाजाराला दिशा देतील. तांत्रिकदृष्ट्या नवीन आठवड्यात बाजारातील वातावरण सकारात्क राहण्याचा अंदाज असून सेन्सेक्स २६,४०० ते २६,७०० आणि िनफ्टी ७,९०० अंकांच्या पातळीत राहील, असा अंदाज बाेनान्झा पोर्टफोलिओचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश गोयल यांनी व्यक्त केला.

नव्या आठवड्यातही विक्रीचा ताण
लांबलचक सुट्यांचा आठवडा आल्यामुळे गुंतवणूकदारांचा भर नफा कमावण्यावरच राहणार अाहे. त्यामुळे नव्या आठवड्यात बाजारात विक्रीचा ताण काही प्रमाणात कायम राहणार असून त्यामध्ये विशेष करून व्याजदर संवेदनशील समभाग लक्ष्य असतील, असे मत भांडवल बाजारातील जाणकारांनी व्यक्त केले.