आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाजारात तेजीचा गोपाळकाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या होणा-या घसरणीने धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी गुरुवारी रुपया सावरताच बाजारात उत्साही खरेदी केली. त्यामुळे सेन्सेक्स 405 अंकांनी वाढला, तर निफ्टीने 124 अंकांची उसळी घेतली. गोकुळ अष्टमीच्या दिवशी दलाल स्ट्रीटवर तेजीच्या गोपाळकाल्याचा प्रसाद गुंतवणूकदारांनी लुटला.


रिझर्व्ह बँकेने रुपयाला सावरण्यासाठी टाकलेल्या पावलांमुळे बाजारात प्रारंभीपासूनच सकारात्मक वातावरण होते. तेल आणि वायू क्षेत्रीय निर्देशांकाने तेजीची आघाडी घेतली. एफएमसीजी, धातू, भांडवली वस्तू आणि आॅटो या क्षेत्रीय निर्देशांकांनी त्याला चांगली साथ देत तेजी कमी होऊ दिली नाही. सेसा गोवाने 13.54 टक्के वाढीसह सर्व समभागांत आघाडी मिळवली. त्यापाठोपाठ एचडीएफसी, हिंदाल्को आणि रिलायन्स इंडस्ट्रीजने मुसंडी मारली. तीनही सरकारी तेल कंपन्यांच्या समभागांची जोरदार खरेदी झाल्याचे दिसून आले. सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 24 समभागांनी वाढ नोंदवली. आशियातील चीन, हाँगकाँग, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि तैवान हे प्रमुख बाजार वाढीसह बंद झाले. युरोपातील प्रमुख बाजारात प्रारंभीच्या सत्रात तेजी दिसून आली.


15 वर्षांतील एका सत्रातील सर्वात मोठी कमाई
मुंबई । डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या बुधवारी झालेल्या पानिपतानंतर रिझर्व्ह बँकेने टाकलेल्या पावलांमुळे गुरुवारी रुपया सावरला. एकाच दिवसात रुपयाने डॉलरच्या तुलनेत 225 पैशांची कमाई केली. गेल्या 15 वर्षांतील एका सत्रात रुपयाने केलेली ही सर्वात मोठी कमाई ठरली. निर्यातदारांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या डॉलरच्या विक्रीनेही रुपयाला बळ मिळाले.
रिझर्व्ह बँकेच्या ‘स्वॅप’मुळे सुधारणा
रुपयाने बुधवारी 68.85 असा नीचांक गाठला होता. त्यानंतर बुधवारी रात्री रिझर्व्ह बँकेने तेल कंपन्यांच्या डॉलर खरेदीसाठी एक खिडकी योजना (स्वॅप) लागू केली. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या या डॉलरच्या मोठ्या खरेदीदार आहेत. इंडियन आॅइल, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांना महिन्याकाठी 8.5 अब्ज डॉलर लागतात. त्यातून महिन्याकाठी 7.5 दशलक्ष टन तेलाची आयात होते. या कंपन्यांना स्वॅपद्वारे चलन उपलब्ध करून दिल्याने चांगली सोय झाली.


सोने घसरले
तगड्या डॉलरच्या जोरावर तेजीच्या रथात स्वार झालेल्या सोन्याला गुरुवारी घसरणीचा खड्डा सहन करावा लागला. राजधानीतील सराफ्यात सोने तोळ्यामागे 1575 रुपयांनी स्वस्त होऊन 32,325 झाले. चांदी किलोमागे 2790 रुपयांनी घसरून 55,710 वर आली. उच्चांकी पातळीवर पोहोचलेल्या सोन्यात नफेखोरी आणि जागतिक सराफा बाजारातील नरमाईमुळे सोने घसरले. बुधवारी रुपयाने 68.85 असा विक्रमी नीचांक गाठल्यानंतर सोने एका दिवसात 1900 रुपयांच्या उसळीसह 33,900 रुपयांवर पोहोचले होते. गुरुवारी मात्र डॉलरच्या रुपया सावरल्याने सोने-चांदीची मागणी घटली.


शॉर्ट टर्मसाठी उपयुक्त
रिझर्व्ह बँकेने उचललेल्या पावलामुळे दीर्घकाळ फायदा होईल, असे निश्चित सांगता येणार नाही. मात्र, डॉलरच्या विक्रीचे अनेक स्रोत बंद करून रिझर्व्ह बँकेने स्वॅपचे चांगले पाऊल उचलले आहे. 2008 मध्येही बँकेने हीच चाल केली होती. अभिषेक गोयंका, सीईओ, इंडिया फॉरेक्स अ‍ॅडव्हायझर्स