आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समभागांतून चांगला परतावा, सोन्या-चांदीवर कुरघोडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी तेथील फेडरल रिझर्व्ह या मध्यवर्ती बँकेने सुरू केलेला रोखे खरेदी कार्यक्रम आवरता घेण्याच्या भीतीमुळे डॉलरच्या मूल्यात सोन्याच्या किमती घसरल्या. त्याचबरोबर भांडवल बाजारात विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भरभरून गुंतवणूक केली. या दोन घडामोडींमुळे या वर्षात सोन्याची कामगिरी अतिशय खराब झाली आहे. त्या तुलनेत समभागातील गुंतवणुकीने नऊ टक्के परतावा दिला.
मागील 15 पैकी जवळपास 12 वर्षांत सोन्याने सकारात्मक परतावा दिल्याचे आकडेवारी सांगते. इतकेच नव्हे, गेल्या दहा वर्षांत सोन्याच्या किमतीत सरासरी 20 टक्क्यांनी वाढ झाली. त्या तुलनेत समभागांच्या किमतीत मात्र 18 टक्के वाढ झाली. कमकुवत भांडवल बाजारात समभागांच्या तुलनेत सोने हेच सुरक्षित गुंतवणुकीचे साधन ठरल्यामुळे आतापर्यंत सोनेच परताव्याच्या बाबतीत वरचढ ठरले होते. परंतु सोन्याच्या आयातीला लगाम घालून चालू खात्यातील तूट नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँक आणि सरकारने केलेल्या कडक उपाययोजनांमुळे दहा ग्रॅम सोन्याची किंमत 30,990 रुपयांवरून आता 30,160 रुपयांपर्यंत, तर चांदीची किंमत किलोमागे 57 हजार रुपयांवरून 43,500 रुपयांवर आली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्यामुळे रिटेल गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा भांडवल बाजाराची आस लागली. एरवी सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याचाच पर्याय पसंत करणार्‍या या गुंतवणूकदारांनी यंदाच्या वर्षात मात्र भांडवल बाजाराचा पर्यायच स्वीकारल्याचे मत बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. गेल्या वर्षात सेन्सेक्सने जवळपास 25 टक्क्यांची वाढ नोंदवली. याच वर्षातील सोन्यातील 12.95 टक्के वाढीच्या तुलनेत सेन्सेक्सनेच जवळपास दुप्पट कमाई केली आहे. सोन्याच्या खालोखाल चांदीमध्ये 12.84 टक्क्यांची वाढ झाली. यंदाचे वर्ष हे खर्‍या अर्थाने भांडवल बाजाराचे वर्ष ठरले. यंदा सलग दुसर्‍या वर्षात सोन्या-चांदीच्या परताव्याची चमक फिकी पडून गुंतवणूकदारांच्या संपत्तीला समभागांमुळे झळाळी आली आहे. त्यामुळे यंदा समभागांमधून गुंतवणूकदाराला जवळपास 9 टक्के परतावा मिळाला. याउलट सोन्याच्या किमतीत तीन टक्क्यांनी तर चांदीच्या किमतीत 24 टक्क्यांनी पडझड झाली आहे. त्यामुळे सलग दोन वर्षे सोने पिछाडीवर पडून दशकभरानंतर शेअर बाजाराने पिवळ्या धातूवर कुरघोडी केली.
यंदाच्या वर्षात सोन्याची चमक फिकी पडून शेअर बाजाराने उसळी घेतली. सोने आणि समभागांच्या किमती यांची दिशा नेहमीच विरुद्ध असते. अपवाद म्हणजे सोने आणि समभागांच्या किमती या दोघांनीही आपली दिशा बदलली, असे मत रेलिगेअर सिक्युरिटीजच्या किरकोळ वितरण विभागाचे अध्यक्ष जयंत मांगलिक यांनी व्यक्त केले.
सरत्या वर्षाची वैशिष्ट्ये
० समभागांमधून गुंतवणूकदाराला सरत्या वर्षात मिळाला जवळपास 9 टक्के परतावा
० सोन्याच्या किमतीत तीन टक्क्यांची घसरण
० चांदीच्या किमती 24 टक्क्यांनी उतरल्या
० सरत्या वर्षात मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकात अनुक्रमे 10 टक्के आणि 16 टक्क्यांनी घसरण.