आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारात तेजीला उधाण, सेन्सेक्स 256 अंकांनी वधारला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी इन्फोसिसच्या आर्थिक निकालाने चांगली सुरुवात झाल्यामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यातच कंपनीने डॉलरमूल्यात मिळणार्‍या महसुलाबाबत सकारात्मक अंदाज व्यक्त केल्यामुळे बाजारात जोरदार खरेदी होऊन सेन्सेक्सने 256 अंकांची उसळी घेतली. गेल्या पाच सप्ताहात सेन्सेक्सने साप्ताहिक आधारावर चांगली कमाई केली आहे.

भांडवल बाजारात सातत्याने निधीचा ओघ येत असून विदेशी शेअर बाजारातील सकारात्मक वातावरणाचादेखील बाजारावर सकारात्मक परिणाम झाला. गेल्या चार सलग सत्रांत सेन्सेक्सने कमाई केली आहे. इन्फोसिसच्या निकालामुळे माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांबरोबरच भांडवली वस्तू आणि स्थावर मालमत्ता कंपन्यांचे समभाग वधारले. विशेष म्हणजे बँकांच्या समभागांचीदेखील चांगली खरेदी झाली.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळच्या सत्रातच 263 अंकांच्या कमाल पातळीवर गेला; परंतु नंतर तो 20,368.06 अंकांच्या नीचांकी पातळीवर आला, परंतु कामकाजाच्या अखेरच्या तासात सेन्सेक्सने उसळी घेत 255.68 अंकांची वाढ नोंदवली आणि तो 20,528.59 अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या पाच सत्रांत सेन्सेक्सने 612.64 अंकांची कमाई केली आहे. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांकदेखील 75.25 अंकांनी वाढून 6,096.20 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

जागतिक शेअर बाजारातील सकारात्मक वातावरण त्याचबरोबर सरकारच्या शटडाऊनसंदर्भात अमेरिका लवकरच काहीतरी निर्णय घेण्याबाबत निर्माण झालेली आशा याचा बाजारावर सकारात्मक परिणाम झाल्याचे बोनान्झा पोर्टफोलिओ लि.चे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश गोयल यांनी सांगितले. दुसर्‍या तिमाहीत इन्फोसिसने अपेक्षेपेक्षा चांगली आर्थिक कामगिरी केल्याचादेखील बाजाराला दिलासा मिळाला.


रुपयाचा दोन महिन्यांचा उच्चांक
डॉलरच्या तुलनेत सध्या फॉर्मात असलेल्या रुपयाने शुक्रवारी दोन महिन्यांचा उच्चांक गाठला. रुपयाने 32 पैशांची कमाई करत 61.07 ही पातळी गाठली. भारतीय कंपन्यां व बँकांसाठी विदेशी कर्ज घेण्याचे नियम रिझर्व्ह बँकेने शिथिल केल्याचा फायदा रुपयाला झाल्याचे फॉरेक्स व्यापार्‍यांनी सांगितले.