आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समभागांच्या खरेदी-विक्रीच्या तांत्रिक बाबी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ट्रेडिंग किंवा डिमॅट अकाउंट थ्री इन वन आपण शेअर मार्केटमध्ये अ‍ॅक्टिव्ह व्हायचे ठरवतो म्हणजे शेअर्सची खरेदी-विक्री करायचे ठरवतो. ही खरेदी-विक्री स्टॉक एक्स्चेंजेसवर होते, पण आपण थेट तिथे जाऊन किंवा तिथून मात्र ती करत नाही. मग शेअर्सची ही खरेदी-विक्री करण्यासाठी कोणत्या तांत्रिक-प्रोसिजरल गोष्टींची आवश्यकता असते? त्यासाठी तीन गोष्टी आवश्यक आहेत : ट्रेडिंग अकाउंट, डिमॅट अकाउंट व बँकेतील सेव्हिंग किंवा करंट अकाउंट व हे तिन्ही एकमेकांशी लिंक्ड म्हणजे संलग्न हवेत. जेव्हा आपण ट्रेडिंग किंवा डिमॅट अकाउंट उघडायचे ठरवतो, तेव्हा 3 इन 1 (थ्री इन वन) म्हणजे हे तिन्ही संलग्न अकाउंट एकत्रितपणेच आपल्याला मिळू शकतात. तशा ऑफर उपलब्ध असतातच.

या ट्रेडिंग, डिमॅट व बँक अकाउंटपैकी बँकेतील सेव्हिंग किंवा करंट अकाउंट म्हणजे काय ते स्पष्ट करण्याची आवश्यकता नाही. आपण आपले पैसे त्यात ठेवतो व लागतील तसे त्यातून काढतो, रोख रक्कम काढतो किंवा दुसर्‍या कोणाला चेक दिल्यावर आपले अकाउंट डेबिट होते. तसेच वेळोवेळी आपण अकाउंटमध्ये पैसे जमासुद्धा करत असतो, तेही रोख रक्कम जमा करून किंवा चेक, ईसीएस इत्यादीद्वारे. डिमॅट अकाउंटसुद्धा हेच काम करते, फक्त पैशाऐवजी त्यात आपण शेअर्स ठेवतो. नंतर त्यात आणखी शेअर्सची भर घालतो किंवा आपण शेअर्स विकले तर ते आपल्या डिमॅट अकाउंटमधून कमी होतात.

स्टॉक ब्रोकिंग हाऊसकडे डिमॅट अकाउंटची सोय - डिमॅट म्हणजे डिमटेरियलायझेशनचे संक्षिप्त रूप. पूर्वी आपण शेअर्स घ्यायचो म्हणजे कागदी शेअर सर्टिफिकेट आपल्याला मिळायचे. ते ज्या कंपनीचे शेअर घेतले आहेत, त्यांच्याकडे पाठवले जायचे. तिथे त्या सर्टिफिकेटवर आपल्या नावाची नोंद व्हायची. आता डिमॅटमुळे या कशाचीच गरज राहिलेली नाही. काम खूप सोपे झालेले आहे. बहुतेक सर्व बँका, काही वित्तसंस्था व स्टॉक ब्रोकिंग हाउसेस यांच्याकडे डिमॅट अकाउंट ओपन करण्याची सोय असते. आपण यापैकी कुठेही ते ओपन करू शकतो. तसेच बँक अकाउंट जसे आपण एकापेक्षा जास्त व निरनिराळ्या किंवा एकाच बँकेत उघडू शकतो, तसेच डिमॅट अकाउंटही एकापेक्षा जास्त सुरू करू शकतो. बँका, स्टॉक ब्रोकिंग हाउसेस इत्यादी ज्यांच्याकडे डिमॅट अकाउंट उघडलेले असते, ते त्यासाठी वार्षिक फी आकारतात. तसेच इतरही काही आकार असतात. तेव्हा डिमॅट अकाउंट उघडण्यापूर्वी त्याची चौकशी करावी. डिमॅट अकाउंटमध्ये आपले शेअर्स जमा असतात, पण शेअर्सची खरेदी-विक्री करण्यासाठी ट्रेडिंग अकाउंट आवश्यक आहे. ते आपण स्टॉक ब्रोकिंग हाउसेसकडे ओपन करू शकतो, तसेच बहुतेक बँकांच्याही सिक्युरिटी हाउसेस अशा वेगळ्या कंपन्या असतात, तिथेही ओपन करू शकतो. उदाहरण बघू म्हणजे जास्त स्पष्ट होईल. एचडीएफसी बँक व त्याच ग्रुपची एचडीएफसी सिक्युरिटीज, आयसीआयसीआय बँक व आयसीआयसीआय सिक्युरिटीज, तसेच कोटक बँक व कोटक सिक्युरिटीज इत्यादी. याशिवाय अनेक खासगी स्टॉक ब्रोकिंग हाउसेस ट्रेडिंग अकाउंटची सुविधा देतात. उदा. शेरखान, रेलिगेअर, मोतीलाल ओसवाल इत्यादी. तसेच काही बँकांचा एखाद्या स्टॉक ब्रोकिंग हाऊसबरोबर टाय-अप असतो. आपण बँकेत डिमॅट अकाउंट उघडतो तेव्हा ते आपल्याला त्याच्याशी संलग्न असा त्या स्टॉक ब्रोकिंग हाऊसचे ट्रेडिंग अकाउंट ओपन करून देतात. ट्रेडींग अकाउंटमध्ये शेअर्स किंवा आपली रक्कम केवळ व्यवहार अगदी पूर्णपणे पूर्ण होईपर्यंत असतात. म्हणजे आपण शेअर्स खरेदी केले व तो व्यवहार पूर्ण झाला की ते आपल्या डिमॅट अकाउंटमध्ये जमा होतात. तसेच आपल्या डिमॅट अकाउंटमध्ये असलेले आपले शेअर्स आपण ट्रेडिंग अकाउंटद्वारे विकले की त्याचे पैसे आपल्या संलग्न बँक अकाउंटमध्ये जमा होतात. आपण बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करेपर्यंत ट्रेडिंग अकाउंटमध्येच राहतात.

शॉर्ट करणे : डिमॅटमध्ये कंपनीचे शेअर्स नसतानाही ते आपण विकू शकतो डिमॅट, ट्रेडिंग व बँक अकाउंट यांची संलग्नताही समजून घेऊ. आपण शेअर्सच्या खरेदी-विक्रीची ऑर्डर देतो ती ट्रेडिंग अकाउंटद्वारे. समजा आपण शेअर्स विक्रीची ऑर्डर दिली तर आधी आपल्या डिमॅट अकाउंटमध्ये ते शेअर्स आहेत की नाहीत याची सिस्टिम खात्री करेल व असतील तरच ऑर्डर अमलात आणली जाईल. तसेच समजा टाटा स्टील कंपनीचे 50 शेअर्स विकायची ऑर्डर दिली व आपल्या खात्यात फक्त 40 शेअर्स असतील तर तेही चालणार नाही. जितके शेअर्स विकायची ऑर्डर दिली आहे, कमीत कमी तितके शेअर्स आपल्याकडे हवेतच. अर्थातच 50 शेअर्स असूनही फक्त चार शेअर्स विकण्याला मात्र काहीच हरकत नसते. (आपल्या डिमॅट अकाउंटमध्ये एखाद्या कंपनीचे काहीही शेअर्स नसतानाही ते आपण विकू शकतो, त्याला शॉर्ट करणे म्हणतात, पण ती नंतरची पायरी आहे. आधी बेसिक गोष्टी समजून घेऊ.) हा विकण्याचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर ते शेअर्स आपल्या डिमॅट अकाउंटमधून कमी होतात आणि या शेअर्सच्या विक्रीतून आलेले पैसे आपल्या बँक अकाउंटमध्ये जमा होतात. म्हणजेच एक विक्रीचा व्यवहार इनिशिएट केला की या पुढच्या गोष्टींसाठी वेगळी काही कृती करण्याची गरज नसते. तिन्ही अकाउंट संलग्न असल्याने हे सुलभपणे होते.

ट्रेडिंग अकाउंटमध्ये रक्कम ट्रान्सफर हवी
आता समजा शेअर्स खरेदी करायचे आहेत. कोणतीही वस्तू खरेदी करायची असेल तर सर्वप्रथम हवेत पैसे! आपल्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये पैसे हवेत, पण आपले ट्रेडिंग अकाउंट कुठे आहे त्याप्रमाणे थोडा फरक असतो. विशेषत: काही खासगी ब्रोकिंग हाउसेसकडे आपले ट्रेडिंग अकाउंट असेल तर खरेदीची ऑर्डर देण्यापूर्वी आपण ट्रेडिंग अकाउंटमध्ये रक्कम ट्रान्सफर करणे आवश्यक असते. ते चेक देऊन करू शकतो किंवा ऑनलाइन करू शकतो. उलट जर समजा एचडीएफसी सिक्युरिटीज इत्यादी काही ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट असेल व आपण खरेदीची ऑर्डर ऑनलाइन देत असू तर ही ऑर्डर इनिशिएट करतो तेव्हा त्या ट्रान्झॅक्शनचाच एक भाग म्हणून आपल्या बँक अकाउंटमधून आधी रक्कम डेबिट होते. ट्रेडिंग अकाउंटमध्ये येते व खरेदीचा व्यवहार होतो. जर व्यवहार काही कारणाने पूर्ण झाला नाही तर रक्कम काही काळाने (बहुधा दुसर्‍या दिवशी) आपल्या खात्यात पुन्हा जमा होते.

शेअर्स खरेदी-विक्री ऑनलाइन
हे शेअर्स खरेदी-विक्रीचे व्यवहार आपण स्वत: ऑनलाइन करू शकतो किंवा ब्रोकरना फोनवर त्याकरिता ऑर्डर देऊ शकतो. माझी पसंती स्वत: ऑनलाइन व्यवहार करण्याला आहे. कारण बर्‍याच गोष्टींवर आपला कंट्रोल राहतो. मात्र वेळ नसेल किंवा नेट कनेक्शन नसेल तर फोनचा पर्याय आहेच.