आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ईपीएस, पीई रेशिओचा उपयोग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईपीएस हा पूर्णपणे कंपनीच्या कामगिरीवर आणि अर्थव्यवस्थेच्या स्थितीवर अवलंबून असतो. शेअर मार्केट त्यात ढवळाढवळ करू शकत नाही. कंपनीने जास्त नफा मिळवला तर तिचा ईपीएस जास्त असतो व शेअर मार्केट सहसा त्या कंपनीच्या शेअरचा भाव वर नेते आणि ईपीएस कमी झाला तर सहसा भाव खाली आणते.

पीई रेशिओ म्हणजे प्राइस टू र्अनिंग रेशिओ
पीई रेशिओ म्हणजे प्राइस टू र्अनिंग रेशिओ अर्थात शेअरची प्राइस (भाव) भागिले ईपीएस. पीई रेशिओ प्रतिशेअर मिळकतीसाठी मार्केट किती किंमत देत आहे हे दर्शवतो. म्हणजेच पीई रेशिओबाबत मात्र शेअर मार्केट काय ठरवेल ते महत्त्वाचे आहे. पीई रेशिओ हा खूप लोकप्रिय व नेहमी वापरला जाणारा निकष आहे. त्यामुळे या पीई रेशिओचा कसा उपयोग होतो ते आपण बघू.

बँकिंग सेक्टरमध्ये खूप भेद
एकच बँकिंग सेक्टर घेतला तर त्यामध्ये प्रायव्हेट सेक्टर बँक व पब्लिक सेक्टर बँक यात मार्केट खूप भेद करते. प्रायव्हेट सेक्टर बँक्स या सेक्टरचा पीई रेशिओ आहे 11.85, तर पब्लिक सेक्टर बँक्स या सेक्टरचा पीई रेशिओ आहे 6.14. याचा अर्थ प्रायव्हेट सेक्टर बँकांच्या शेअरना जितका भाव द्यायला मार्केट तयार आहे त्याच्या निम्म्याने फक्त पब्लिक सेक्टर बँकांच्या शेअरना देऊ करते. याची कारणेही उघड आहेत. मार्केट ज्या कंपन्यांची चांगल्या गतीने वाढ होते, ज्यांचे र्अनिंग जास्त वेगात वाढते त्या कंपन्यांच्या शेअरना जास्त भाव देते आणि याबाबतीत खासगी बँका आघाडीवर असतात. त्या दरवर्षी आपला व्यवसाय वाढवत नेतात. उलट सरकारी बँका आपला व्यवसाय त्या वेगाने वाढवण्याबाबत कमी पडतात. हा सेक्टरचा सरासरी पीई रेशिओ असला तरी त्यात प्रत्येक कंपनीचा पीई वेगळा असतो. पब्लिक सेक्टर बँकांपैकी स्टेट बँकेचा पीई 9.11 आहे, तर देना बँकेचा 2.97. पण देना बँकेचा पीई इतका कमी असूनही तो लगेच त्यात गुंतवणूक करण्यायोग्य आहे असे नाही. मार्केट त्याला कमी किंमत देते. कारण वाढीची मार्केटला शक्यता कमी वाटते.

खूप जास्त वर गेलेल्या शेअरपासून दूर राहणे उत्तम
तसेच प्रायव्हेट सेक्टर बँकांपैकी एचडीएफसी बँकेचा पीई 23 आहे, तर अ‍ॅक्सिस बँकेचा 11. पण या खासगी बँकांपैकी धनलक्ष्मी बँक या छोट्या बँकेचा पीई मात्र 135 आहे. हा इतका अवास्तव आहे. कारण ही कोणी टेकओव्हर करेल अशा बातम्या अफवा येतात व त्यामुळे भाव वाढेल असे वाटून भाव वर जातो. पीई रेशिओचा हा इथे खूप महत्त्वाचा ठरतो. अशा खूप जास्त वर गेलेल्या शेअरपासून दूर राहणे उत्तम. त्यात धोका जास्त असतो. या शेअरमधील गुंतवणुकीतून फायदाही होऊ शकतो, पण आपण कसलेले व अनुभवी गुंतवणूकदार असू तरच. नवीन गुंतवणूकदारांनी मात्र त्यापासून दूर राहावे.

स्टील सेक्टर अर्थव्यवस्थेचा कणा
स्टील सेक्टर हा अर्थव्यवस्थेचा कणा. त्यामुळेच हा सायक्लिकल सेक्टर आहे. मंदी असेल तर स्टीलला मागणी कमी व त्यामुळे कंपन्यांची कामगिरी घसरते. उलट अर्थव्यवस्थेत तेजी असेल तर स्टीलची मागणी वाढते. सध्या या सेक्टरचा पीई 6.66 आहे व त्यात या सेक्टरमधील एक मोठी कंपनी टाटा स्टीलचा पीई 4.92 आहे.

स्टील सेक्टरला मार्केट इतका कमी पीई देते, मात्र फार्मा सेक्टर हा बचावात्मक सेक्टर समजला जातो व या सेक्टरमधील कंपन्यांच्या शेअरचा पीई जास्त असतो. या फार्मा सेक्टरचा पीई 31 आहे व त्यातील सन फार्माचा तर खूपच जास्त म्हणजे 140 आहे. फर्टिलायझर सेक्टर हाही मार्केटच्या मर्जीतील नाही. त्यामुळे या सेक्टरचा सरासरी पीई 5 आहे, तर यातील कोरोमंडल इंटरनॅशनल या खासगी क्षेत्रातील कंपनीचा पीई 11 आहे. गुंतवणूक सल्ला देणार्‍यात ज्या साइट असतात त्यावर हे पीई रेशिओ व इतर माहिती मिळू शकते.

सर्वसाधारण कल्पना येण्यासाठी या रेशिओंचा नक्कीच उपयोग
खूप जास्त-अवास्तव पीई असेल व त्यामागे आर्थिक कारण नसेल तर सहसा त्यात गुंतवणूक करू नये. तसेच खूप कमी पीई असेल तर कारण शोधावे. जसजसा या रेशिओंचा उपयोग करू तसा त्याचा सराव होईल. निर्णय घेण्यासाठी मदत होईल.