आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेन्सेक्स, निफ्टीची आगेकूच कायम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जागतिक शेअर बाजारातील सकारात्मक वातावरण आणि भांडवल बाजारात वाहू लागलेली निधीची गंगा यामुळे बाजारात सध्या तेजीची हवा कायम आहे. त्यामुळे सलग नवव्या सत्रात सेन्सेक्सने १२० अंकांची उसळी घेत २७१३९.९४ अंकांच्या विक्रमी पातळीवर बंद झाला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक भक्कम पातळीवर उघडला. खरेदीचे जोरदार पाठबळ मिळाल्यावर थोड्याच वेळात सेन्सेक्सने २७,२२५.८५ अंकांची कमाल पातळी गाठली; परंतु नफारूपी विक्रीचे गालबोट लागल्यामुळे सेन्सेक्स २७,१३९.९४ अंकांच्या पातळीवर बंद झाला. पण तरीही दिवसअखेर सेन्सेक्स १२०.५५ अंकांनी वाढला. राष्ट्रीय बाजारातील निफ्टीचा निर्देशांक ३१.५५ अंकांनी वाढून ८११४०.६० अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या नऊ सत्रांमध्ये सेन्सेक्सने ८२५ अंकांची कमाई केली आहे.

बाजारात झालेल्या खरेदीत माहिती तंत्रज्ञान, स्थावर मालमत्ता, धातू, तंत्रज्ञान, भांडवली वस्तू समभागांना चांगली मागणी आली परंतु एफएमसीजी, बँका आणि ऊर्जा समभागांना फटका बसला.

अमेरिकेतील उत्पादन आणि बांधकामाच्या आकडेवारी सुधारणा झाल्यामुळे माहिती तंत्रज्ञान विशेष करून टीसीएस, इन्फोसिस, विप्रो या समभागांनी बाजाराचे लक्ष वेधले.

रशिया आणि युक्रेनमधील तणाव कमी होण्याच्या शक्यतेमुळे जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. कच्च्या तेलाचे भाव कमी झाल्यामुळेदेखील मोठा दलिासा मिळाला आहे. त्याचबरोबर भारती एअरटेल, कोल इंडियासारख्या काही विशिष्ट समभागांची खरेदी बाजारात झाल्याचे मत बोनान्झा पोर्टफोलिओचे मुख्य संशोधक विश्लेषक निधी सारस्वत यांनी व्यक्त केले.
टॉप गेनर्स : इन्फोसिस, कोल इंडिया, विप्रो, भारती एअरटेल, टीसीएस, लार्सन अँड टुब्रो, टाटा स्टील, टाटा मोटर्स, महिंद्र, अॅक्सिस बॅंक, टाटा पॉवर.

टॉप लुझर्स : गेल, आयटीसी , ओएनजीसी, बजाज ऑटो, भेल