आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घसरणीला विराम, सेन्सेक्स वधारला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती घटल्यामुळे सौदापूर्ती सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी बाजाराला मोठा दिलासा मिळाला. किरकोळ गुंतवणूकदार तसेच निधी संस्थांकडून मिळालेल्या खरेदीच्या पाठिंब्यामुळे सेन्सेक्सने 37 अंकांची वाढ नोंदवली.
गेल्या दोन दिवसांत सेन्सेक्सने 306.23 अंकांची डुबकी मारली होती, परंतु डेरिव्हेटिव्हज व्यवहारांना सुरुवात झाल्यामुळे सेन्सेक्स दिवसअखेर सकारात्मक पातळीवर राहण्यास मदत झाली. खरेदीच्या पाठबळावर दिवसभरात 25,209.61 अंकांची कमाल पातळी गाठल्यानंतर सेन्सेक्स 37.25 अंकांनी वाढून 25,099.92 अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीच्या निर्देशांकाने 15.60 अंकांची वाढ नोंदवली आणि तो 7,508.80 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

रॅनबॅक्स लॅबोरेटरीजच्या एका उपकंपनीने बाजारात आणलेल्या अतितणावावरील औषधाला अमेरिकेकडून नियामक मान्यता मिळाली आहे. त्यामुळे रॅनबॅक्सी लॅबच्या समभागांनी गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले. परिणामी कंपनीच्या समभाग किमतीत 5.14 टक्क्यांनी वाढ होऊन ती 496 अंकांच्या कमाल पातळीवर गेली.

डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 60.11 ने वाढल्यामुळेदेखील बाजाराला मोठा दिलासा मिळाला. त्यातूनही जुलैतील डेरिव्हेटिव्हज व्यवहारांना झालेला प्रारंभ आणि कच्च्या तेलाच्या कमी झालेल्या किमती यामुळे बाजाराचा खरेदीचा उत्साह वाढला.

जागतिक शेअर बाजारामध्ये आशियाई शेअर बाजारात संमिश्र वातावरण होते. परंतु अमेरिकेतील ग्राहक आत्मविश्वासाच्या आकडेवारीमध्ये सकारात्मक वाढ झाल्यामुळे युरोप शेअर बाजारात तेजी आली.