आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजीच्या तडक्याचा आठवडा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून भांडवल बाजारात सातत्याने येत असलेली निधीची गंगा आणि त्यातच कंपन्यांचे सुखावणारे तिमाही आर्थिक निकाल यामुळे संपूर्ण आठवडा बाजारासाठी खरेदीचा ठरला. रिफायनरी, बॅँका, भांडवली वस्तू, वाहन, धातू आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची मोठ्या प्रमाणावर खरेदी झाल्यामुळे सलग तिस-या आठवड्यात सेन्सेक्स 584 अंकांनी वाढला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक साप्ताहिक आधारावर 584.39 अंकांची झेप घेत दिवसअखेर 16,739.01 अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या तीन सत्रांत सेन्सेक्सने जवळपास 1,284.09 अंकांची उसळी घेतली आहे. राष्ट्रीय बाजारातील निफ्टीचा निर्देशांक 182.60 अंकांनी वाढून 5048.60 अंकांच्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी 7 डिसेंबरनंतर पहिल्यांदाच इतक्या उच्चांकी पातळीवर बंद झाले आहेत.
महागाईने दिला दिलासा : संपूर्ण आठवड्यामध्ये भांडवल बाजाराला सर्वात सुखद धक्का मिळाला तो चलनवाढीने गेल्या दोन वर्षाचा नीचांक गाठल्यामुळे पुढच्या आठवड्यात जाहीर होणा-या नाणेनिधी धोरण आढाव्यात व्याज दर घटणार अशी बाजाराला मोठी आशा वाटत आहे; परंतु त्याचबरोबर मंदावलेल्या आर्थिक विकासाला चालना मिळण्याच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत.
कंपन्यांच्या निकालांनी केली जादू : खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बॅँक, हीरो मोटोकॉर्प, बजाज आॅटो, टाटा पॉवर, एनटीपीसी, डीएलएफ, मारुती सुझुकी, टाटा मोटार्स, आयसीआयसीआय बॅँक, एचडीएपी बॅँक, स्टेट बॅँक आॅप इंडिया या कंपन्यांनी तिमाहीत कमावलेला भक्कम नफा सेन्सेक्सचा पार सहा आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर घेऊन गेला. बायबॅक खरेदीच्या योजनेमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांनी चांगली कमाई केली.
‘एफआयआय’ची दणकून खरेदी : भांडवल बाजारात विदेशी गुंतवणूकदार जास्त सक्रिय झाल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. या गुंतवणूकदारांनी 10 ते 19 जानेवारी या कालावधीत तब्बल 4,441.37 कोटी रुपयांची समभाग खरेदी केल्याचे शेअर बाजाराकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीमध्ये नमूद केले आहे.
उलाढाल वाढली : मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारातील उलाढाल लक्षणीय वाढली. मुंबई शेअर बाजाराची उलाढाल अगोदरच्या आठवड्यातील 12,500.80 कोटी रुपयांवरून 12,718.82 कोटी रुपयांवर तर राष्ट्रीय शेअर बाजारातील 55,525.31 कोटी रुपयांवरून 59,194.05 कोटी रुपयांवर गेली
आंतरराष्ट्रीय घडामोडी सकारात्मक
केवळ स्थानिक घडामोडीच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही सकारात्मक घडमोडींचा परिणाम बाजारावर झाला. त्यात 2011 वर्षाच्या चौथ्या तिमाहीत चीनने आर्थिक विकासदराच्या वाढीमुळेही बाजारामध्ये उत्साह वाढला.
टॉप गेनर्स
स्टर्लाइट इंडस्ट्रीज, हिंदाल्को,
टाटा स्टील.
क्षेत्रीय निर्देशांकांची वाढ
स्थावर मालमत्ता : 7.79 %, तेल आणि वायू : 6.43 %, बँकेक्स : 5.94 %, ग्राहकोपयोगी वस्तू : 5.49 %,
वाहन : 4.17 %, धातू : 4.10 %, ऊर्जा : 3.83 %.