मुंबई - उत्पादन क्षेत्राने घेतली गती, वाहन विक्री होऊ लागलेल्या सुधारणांमुळे गुंतवणूकदारांना अच्छे दिन आल्यासारखे वाटू लागले आहे. त्यामुळे पावसाने दडी मारूनदेखील त्याकडे काहीसा कानाडोळा करीत सलग तिसर्या सत्रात झालेल्या खरेदीमध्ये सेन्सेक्सने 103 अंकांची उसळी घेतली. त्याचबरोबर गेल्या दोन आठवड्यांचा उच्चांक नोंदवला.
स्थानिक घडामोडींबरोबरच जागतिक बाजारातील स्थिर वातावरण आणि विदेशी निधीचा वाढलेला ओघ यामुळेदेखील बाजारावर सकारात्मक परिणाम झाला. बाजारात झालेल्या खरेदीमध्ये प्रामुख्याने वाहन, धातू, भांडवली वस्तू आणि स्थावर मालमत्ता समभागांना चांगली मागणी आली. परंतु औषध, माहिती तंत्रज्ञान आणि रिफायनरी समभागांना मात्र काहीसा फटका बसला.
बाजारातील खरेदीचा उत्साह कायम असल्याने सेन्सेक्स चांगल्या पातळीवर उघडला. त्यानंतर तो 105 अकांपर्यंत वाढला होता. दिवसअखेर सेन्सेक्स 102.57 अंकाच्या वाढीची नोंद करीत 25.516.35 अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक 23.25 अंकांनी वाढून 7,634.70 अंकांच्या पातळीवर स्थिरावला.
मेमध्ये आठ प्रमुख पायाभूत उद्योगांच्या वाढीत झालेली घट तसेच चालू खात्यातील तूट 2.4 लाख कोटी रुपयांवर गेलेली यामुळे बाजाराच्या आनंदावर काहीसे विरजण पडले.
टॉप गेनर्स : हिंदाल्को, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, महिंद्रा, टाटा स्टील., हिंदुस्तान युनिलिव्हर, सेसा स्टर्लाइट, लार्सन अॅँड टुब्रो, आयसीआयसीआय बॅँक.
टॉप लुझर्स : टीसीएस, विप्रो, सन फार्मा, एचडीएफसी, इन्फोसिस.
सोने-चांदी चकाकले, रुपया वधारला
जागतिक सराफा बाजारातील सकारात्मक संकेत आणि देशातील सराफा व्यापार्यांकडून आलेल्या मागणीमुळे सोने मंगळवारी तेजीने चकाकले. सोने तोळ्यामागे 255 रुपयांनी वाढून 28,730 झाले. चांदी किलोमागे 500 रुपयांनी वाढून 45,300 झाली. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 10 पैशांनी वाढून 60.07 झाले.