आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्सची उसळी; पतधोरण आढाव्यापूर्वी बाजारात तेजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रिझर्व्ह बँक मंगळवारी पतधोरणाचा द्वैमासिक आढावा घेणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सोमवारी शेअर बाजारात भरभरून खरेदी केली. त्यामुळे सेन्सेक्स तसेच निफ्टीने दोन आठवड्यांचा उच्चांक गाठला. रुपयाची डळमळीत चाल पाहून माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. त्यामुळे सेन्सेक्स 242.32 अंकांनी वाढून 25,723.16 झाला. निफ्टीने 81.05 अंकांची कमाई करत 7683.65 पर्यंत मजल मारली. तिकडे विदेशी मुद्रा विनिमय बाजारात सोमवारी रुपयाने डॉलरची धुलाई करत 60.93 ही पातळी गाठली.

कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घट, तसेच पोर्तुगालच्या केंद्रीय बँकेने थकबाकीदारांना आर्थिक मदत देण्याची केलेली घोषणा आणि स्थानिक समभागांची झालेली जोरदार खरेदी यामुळे बाजारात तेजी परतल्याचे ब्रोकर्सनी सांगितले. मागील दोन सत्रांत सेन्सेक्समध्ये 606.38 अंकांची घसरण झाली होती. रिझर्व्ह बँक मंगळवारी धोरण आढावा घेणार आहे. त्यात प्रमुख व्याजदर जैसे थे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अ‍ॅक्सिस बँक, एसबीआय, आयसीआयसीआय बँक या व्याजदराशी संवेदनशील समभागांत एक टक्क्यापर्यंत तेजी दिसून आली. ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू, रिअ‍ॅल्टी, भांडवली वस्तू आणि ऑटो कंपन्यांच्या समभागांनाही चांगली मागणी आली.
आशियातील प्रमुख शेअर बाजारांत संमिश्र कल दिसून आला. युरोपातील बाजारातही यापेक्षा वेगळे चित्र नव्हते.
तेजीचे मानकरी
इन्फोसिस, हिंदाल्को, सेसा स्टरलाइट, मारुती, भेल, बजाज ऑटो, टाटा मोटर्स, ओएनजीसी, एल अँड टी, आयटीसी, टाटा पॉवर, महिंद्रा अँड महिंद्रा, आयसीआयसीआय बँक

तेजीची कारणे
- कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घट, तसेच पोर्तुगालच्या केंद्रीय बँकेने थकबाकीदारांना आर्थिक मदत देण्याची केलेली घोषणा
- रिझर्व्ह बँक मंगळवारी पतधोरणाचा द्वैमासिक आढावा घेणार आहे. त्या पार्श्वभूमीवर व्याजदराशी निगडित समभागांची खरेदी.

रुपयाला तरतरी
गेल्या दोन आठवड्यांपासून अवमूल्यनाच्या फेर्‍यात अडकलेल्या रुपयाने सोमवारी डॉलरची धुलाई करत तीन आठवड्यांतील उच्चंकी पातळी गाठली. डॉलरच्या तुलनेत रुपयाने 25 पैशांची कमाई करत 60.93 पर्यंत मजल मारली.