मुंबई - कोणत्याही नवीन कराचा भार नसलेल्या हंगामी अर्थसंकल्पाने भांडवल बाजाराला खुश केले आहे. दुसर्या दिवशीही हा आनंद कायम राहून बँका, भांडवली वस्तू आणि वाहन समभागांना चांगली मागणी येऊन सेन्सेक्सने 170 अंकांची उसळी मारली. विशेष म्हणजे सेन्सेक्स 20,634.21 अंकांच्या कमाल पातळीवर बंद झाला.
अगोदरच्या दोन सत्रांत 271 अंकांची कमाई सेन्सेक्सने केली असून मंगळवारी त्यात आणखी 170.15 अंकांची भर पडली. सेन्सेक्सने 29 जानेवारीनंतरची सर्वात मोठी कमाल पातळी नोंद केली आहे. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक 53.80 अंकांनी वाढून 6127.10 अंकांच्या पातळीवर बंद झाला. हंगामी अर्थसंकल्प सादर करताना वित्तमंत्र्यांनी वित्तीय तूट जीडीपीच्या तुलनेत 4.6 टक्क्यांवर नियंत्रित ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. त्याचप्रमाणे वाहन आणि भांडवली वस्तूंवरील अबकारी कर कमी केला. अर्थसंकल्पामुळे गुंतवणूकदारांच्या आत्मविश्वासात आणखी भर पडली. त्यामुळे बाजारात नव्याने खरेदीचा
उत्साह संचारल्याचे मत बोनान्झा पोर्टफोलिओचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश गोयल यांनी व्यक्त केले.
आर्थिक वाढीत सुधारणा आणि पर्यायाने व्यावसायिक वातावरणाला संजीवनी मिळण्याच्या अपेक्षेमुळे बँकांच्या समभागांमध्ये लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे अॅक्सिस बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँकेच्या समभागांना मागणी आली. गेल, आयटीसीचे समभागही चमकले.