आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजीतले शेअर्स विक्रीत फायदा; विश्लेषकांना वाटतेय नफेखोरीची भीती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबई शेअर बाजारातील चांगल्या तेजीनंतर आता नफेखोरीची लाट येण्याची भीती विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. मोठय़ा प्रमाणात नफेखोरी झाल्यास सेन्सेक्स 7 ते 10 टक्क्यांपर्यंत घसरू शकतो. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांना तेजीच्या लाटेवर स्वार असणार्‍या शेअर्सची विक्री करणे योग्य राहील असे मत विश्लेषकांनी व्यक्त केले.
टॉरस म्युच्युअल फंडाचे सीईओ वकार नकवी सांगतात की, बाजारात सध्या तरी मोठय़ा घसरणीची शक्यता नाही. मात्र एखाद्या गुंतवणूकदाराने खरेदी केलेल्या समभागांत चांगली तेजी आली असेल, तर तो समभाग विकून नफा पदरी पाडून घेणे केव्हाही उत्तम. कारण नफेखोरीवर सर्व काही अवलंबून आहे. नफेखोरी झाल्यास बाजारात 7 टक्क्यांपर्यंत घसरू शकतो.

जियोजित बीएनपी पारिबाचे अलेक्स मॅथ्यूज यांच्या मते, निवडणुकीपूर्वी बाजारात जी तेजी येणार होती ती येऊन गेली आहे. आता तेजी येईल ती निवडणुकीच्या निकालानंतर. डिफेन्सिव्ह समभागांत सध्या विक्री सुरू झाली आहे, गुरुवारी हे दिसून आले. त्यांच्या मते युक्रेनचे संकट अद्याप टळलेले नाही आणि चीनमधूनही निराशाजनक आकडेवारी येत आहे. या स्थितीमुळे बाजारात घसरण होण्याची दाट शक्यता आहे. ही घसरण किती असेल हे निश्चित सांगता येणार नाही.
सीएनआय रिसर्चचे अध्यक्ष किशोर ओस्तवाल यांनी सांगितले, बाजाराची एकंदरीत चाल पाहिल्यास सध्या तरी घसरणीची शक्यता नाही. मात्र, नफेखोरी झाल्यास ही तेजी जास्त काळ टिकणार नाही. अत्यंत नकारात्मत घडामोड घडली तर बाजारात घसरण होईल. सध्याची स्थिती नफा पदरात पाडून घेण्यात जास्त शहाणपणा आहे.
आणखी एका विश्लेषकाच्या मते, ज्या समभागांत चांगली तेजी आली आहे असे समभाग विकून टाकण्यात फायदा आहे. तसेच ज्या शेअर्सच्या किमती खालच्या पातळीत आहेत त्या वाढण्याची शक्यता आहे, अशा समभागांत गुंतवणुकीला वाव आहे.

नफेखोरीकडे लक्ष
बाजारात सध्या तरी मोठय़ा घसरणीची शक्यता नाही. मात्र एखाद्या गुंतवणूकदाराने खरेदी केलेल्या समभागांत चांगली तेजी आली असेल, तर तो समभाग विकून नफा पदरी पाडून घेणे केव्हाही उत्तम. कारण नफेखोरीवर सर्व काही अवलंबून आहे. नफेखोरी झाल्यास बाजार 7 टक्क्यांपर्यंत घसरू शकतो.
-वकार नकवी, सीईओ, टॉरस म्युच्युअल फंड

अत्यंत नकारात्मक घडामोड घडली तर बाजारात घसरण होईल. सध्याच्या स्थितीत नफा पदरात पाडून घेण्यात जास्त शहाणपणा आहे.
- किशोर ओस्तवाल, अध्यक्ष, सीएनआय रिसर्च