आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - आर्थिक वाढीबद्दलची चिंता, युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध भडकण्याच्या शक्यतेमुळे जागतिक शेअर बाजारात झालेली घसरण या नकारात्मक घडामोडींचा बाजारावर परिणाम झाला. गेल्या पाच दिवसांपासून आलेल्या तेजीला ब्रेक लागून नफारूपी विक्रीच्या मा-यात सेन्सेक्स 173 अंकांनी गडगडला.
हेल्थकेअर, माहिती तंत्रज्ञान, वाहन, भांडवली वस्तू समभागांना मात्र सर्वात जास्त फटका बसला. परिणामी 12 पैकी 10 क्षेत्रीय निर्देशांकाची घसरगुंडी झाली. परंतु ग्राहकोपयोगी वस्तू तसेच तेल आणि वायू समभागांमुळे घसरणीला लगाम बसला. टीसीएस, आयसीआयसीआय बॅँक, सन फार्मा यासह जवळपास 25 समभागांमुळे सेन्सेक्स खाली आला. त्यातल्या त्यात डॉ. रेड्डीज लॅब आणि भेल यांना सर्वात जास्त नुकसान सहन करावे लागले. रिलायन्स आणि आयटीसीच्या समभागांना चांगली मागणी आली.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 173.47 अंकांनी घसरून 20946.65 अंकांवर बंद झाला. गेल्या पाच दिवसांमध्ये झालेल्या 583 अंकांच्या कमाईला ब्रेक लागला. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांकदेखील 55.50 अंकांनी घसरून 6221.45 अंकांच्या पातळीवर बंद झाला.
बाजाराने अलीकडेच भरपूर कमाई केल्यामुळे त्याचा फायदा उचलून गुंतवणूकदारांनी नफारूपी विक्रीचा मारा करणे पसंत केले. डिसेंबर तिमाहीअखेर आर्थिक वृद्धीत झालेली घट, जागतिक शेअर बाजारातील मरगळ याचाही बाजारावर नकारात्मक परिणाम झाला.
युक्रेनमध्ये रशियाच्या लष्कराने आणखी कूच केल्यामुळे वाढलेला तणाव तसेच रशियाकडून होणा-या पुरवठ्यात अडचणी निर्माण होण्याच्या शक्यतेने कच्च्या तेलाच्या भावात बॅरलमागे 104 डॉलरपर्यंत झालेली वाढ यामुळे जागतिक शेअर बाजारात घसरण झाली. आशिया आणि युरोप शेअर बाजारातही मरगळीचाच कल होता.
क्षेत्रीय घसरण : आरोग्य 1.55 %, माहिती तंत्रज्ञान 1.25 %, ऊर्जा 1.18 %, वाहन 1.18 %
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.