आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स 22 हजारांकडे,गुंतवणूकदारांच्या श्रीमंतीत 85 हजार कोटींची भर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वित्तीय तसेच चालू खात्यातील तूट नियंत्रणात आल्यामुळे बाजारात खरेदीचा जोर वाढला. युरोप, आशियाई शेअर बाजारांतील तेजीची त्यात आणखी भर पडली. एका क्षणी सेन्सेक्स 22 हजारांच्या शिखराला स्पर्श करतो की काय असे वाटले. पण तसे झाले नाही. बाजारात निवडणूकपूर्व आलेल्या तेजीच्या झंझावातामध्ये सेन्सेक्सने 21,919.79 आणि निफ्टीने 6526.65 अंकांच्या आणखी एका विक्रमी पातळीची नोंद केली. आजच्या तेजीने गुंतवणूकदारांच्या श्रीमंतीमध्ये जवळपास 85 हजार कोटींची भर पडली.


स्थावर मालमत्ता, बँका, भांडवली वस्तू , तेल आणि वायू समभागांची तुफान खरेदी झाल्यामुळे गुंतवणूकदारांची श्रीमंती वाढली. त्यातून आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्यासह अन्य बड्या समभागांना मागणी आल्याने सेन्सेक्सने शुक्रवारी 21,960.89 अंकांची सर्वात कमाल पातळी गाठली. 22 हजारांचे शिखर गाठण्यासाठी सेन्सेक्स फक्त 40 अंकांपासून दूर राहिला. गुरुवारच्या बंद पातळीच्या तुलनेत सेन्सेक्समध्ये 405.92 अंकांची वाढ झाली आहे. सेन्सेक्सने जबरदस्त उसळी घेऊनही माहिती तंत्रज्ञान आणि औषध समभागांवर मात्र ताण आला.


गेल्या चार दिवसांत सेन्सेक्सने 973 अंकांची कमाई करून तो 21,513.87 अंकांच्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्सने आपला अगोदरचा 23 जानेवारीचा 21,373.66 अंकांच्या अत्युच्च पातळीचा विक्रम मोडला आहे. राष्‍ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीच्या निर्देशांकानेदेखील 9 डिसेंबर 2013 चा 6,415.25 अंकांच्या कमाल पातळीचा विक्रम मोडून शुक्रवारी निफ्टी 6537.80 अंकांच्या कमाल पातळीवर गेला होता. दिवसअखेर निफ्टीमध्ये 125.50 अंकांची वाढ होऊन 6526.65 अंकांच्या पातळीवर बंद झाला.


वित्तमंत्री पी चिदंबरम यांनी वित्तीय आणि चालू खात्यातील तूट नियंत्रणाखाली असून अगोदरच्या 18 महिन्यांच्या तुलनेत अर्थव्यवस्था स्थिरावली असल्याचा निर्वाळा दिला. वित्तमंत्र्यांच्या या दिलाशानंतर दलाल स्ट्रीटवर खरेदीला उधाण आले. विदेशी निधी संस्था, किरकोळ गुंतवणूकदारांचा वाढलेला सहभाग लक्षात घेता नजीकच्या काळात बाजाराला चालना मिळणार आहे. निवडणुकांपूर्वीची तेजी सध्या बाजारात बघायला मिळत असल्याचे मत रेलिगेअर सिक्युरिटीजच्या किरकोळ वितरण विभागाचे अध्यक्ष जयंत मंडलिक यांनी व्यक्त केले. अमेरिकेतील रोजगाराची आकडेवारी शनिवारी जाहीर होणार असल्यामुळे त्याअगोदर आशिया, युरोप शेअर बाजारात आलेली तेजी मुंबई शेअर बाजारासाठी फायद्याची ठरली. गेल्या सलग पंधरा दिवसांत विदेशी गुंतवणूकदारांनी खरेदी कायम ठेवल्यामुळे बाजारात तेजी आहे.


तेजीचे मानकरी
भेल, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, मारुती सुझुकी, एल अँड टी, एसबीआय, हिंदाल्को, कोल इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा स्टील


149 समभागांचा वार्षिक उच्चंक
सेन्सेक्सने 22 हजारांकडे झेप घेतल्याने आलेल्या तेजीत 149 समभागांनी 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. अदानी पोर्ट्स, अपोलो टायर्स, भारती इन्फ्राटेल, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी, लार्सन अँड टुब्रो, एसकेएस मायक्रोफायनान्स आदी कंपन्यांनी वर्षभरातील सर्वोच्च् पातळी गाठली. सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 22 समभाग वधारले.


सोने-चांदी चकाकले
मौल्यवान धातूंना शुक्रवारी चांगली मागणी आली. त्यामुळे सोने आणि चांदीच्या किमती वधारल्या. राजधानीतील सराफ्यात सोने तोळ्यामागे 240 रुपयांनी वाढून 31,060 झाले, तर चांदी किलोमागे 280 रुपयांनी चकाकून 47,330 रुपये झाली. सराफा व्यापा-यांनी सांगितले, गेल्या दोन दिवसांत झालेल्या विक्रीमुळे सोने घसरले होते. घसरलेल्या पातळीवर चांगल्या प्रमाणात खरेदी झाल्याने सोने चकाकले. सिंगापूर सराफा बाजारातही सोने औंसमागे 1351.05 डॉलरवर पोहोचले.