आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा उच्चाक: सेन्सेक्सला विक्रमी ऊर्जा; सोने 300 रुपयांनी स्वस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सलग चौथ्या सत्रात शुक्रवारी सोने घसरले. राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोने तोळ्यामागे 300 रुपयांनी घसरून 28,250 झाले. हा सोन्याचा 10 महिन्यांचा नीचांक आहे. चांदी मात्र किलोमागे 50 रुपयांनी वाढून 41,700 झाले. सराफा व्यापार्‍यांनी सांगितले, रिझर्व्ह बँकेने आयात निर्बंध शिथिल केल्यापासून सोन्याच्या किमती गतीने घसरत आहेत. तसेच गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा तेजीने उजळणार्‍या शेअर बाजाराकडे वळवल्यानेही सोन्यावर दबाव आला.

देशतील सर्वात मोठी कर्जदाती बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नफ्यात चौथ्या तिमाहीत 7.83 टक्के घट झाली आहे. बाजाराच्या अपेक्षेपेक्षा ही घट कमी असल्याने एसबीआयचे समभाग 9.69 टक्क्यांनी वधारले. एसबीआयला चौथ्या तिमाहीत 3,041 कोटींचा नफा झाला आहे. बँकेच्या एकूण उत्पन्नात मात्र चांगली वाढ झाली आहे.

रुपया घसरला : गुरुवारी उच्चंकी स्तर गाठणार्‍या रुपयाला शुक्रवारी डॉलरने झटका दिला. डॉलरच्या तुलनेत रुपया पाच पैशांनी घसरून 58.52 झाला.

टॉप गेनर्स : टाटा पॉवर, मारुती सुझुकी, एनटीपीसी, ओएनजीसी, सेसा स्टर्लाइट, भेल, भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्रा अँड महिंद्रा, एल अँड टी, कोल इंडिया, हीरो मोटोकॉर्प, एचडीएफसी, टाटा स्टील, अँक्सिस बँक, विप्रो.

टॉप लुझर्स : हिंदाल्को, एचडीएफसी बँक, इन्फोसिस.

ऊर्जा समभागांना नवीन ऊर्जा
मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार पवन आणि ऊर्जा क्षेत्राला गती देण्याच्या अपेक्षेने या क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची मागणी वाढली. एनटीपीसी, टाटा पॉवर, अदानी पॉवर, रिलायन्स पॉवर, पॉवर ग्रीड, जेपी पॉवर या समभागांनी भाव खाल्ला.

सेन्सेक्सला विक्रमी ऊर्जा
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार ऊर्जा क्षेत्राला गती देण्याची मोठी आशा बाजाराला लागली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी दणदणीत खरेदी करून ऊर्जा मिळवली. त्यातच स्टेट बँकेच्या तिमाही निकालामुळे बाजाराचा उत्साह आणखी दुणावला. परिणामी सेन्सेक्सने एकाच दिवसात सर्वात मोठी झेप घेतली. गेल्या दहा दिवसांतील सेन्सेक्सची ही चांगली कमाई होती. खरेदीच्या लाटेवर सेन्सेक्सबरोबरच निफ्टीनेदेखील नव्या उच्चांकाची नोंद केली.

सेन्सेक्स आणि निफ्टीने गेल्या तीन आठवड्यांत दहा टक्के कमाई केली आहे. सौदापूर्ती सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी सेन्सेक्स खरेदीच्या पाठिंब्यावर 319 अंकांची उसळी घेत 24,693.35 अंकांची नवी उच्चांकी बंद पातळीची नोंद केली. जागतिक शेअर बाजारातील भक्कम स्थितीमुळे गुंतवणूकदारांनी बॅँका, रिफायनरी, भांडवली वस्तू, वाहन समभागांवर उड्या मारल्या. सेन्सेक्सने 20 मे रोजी गाठलेली 24,376.88 अंकांची विक्रमी बंद पातळी शुक्रवारी मोडून काढली. त्याचबरोबर 13 मेपासून सेन्सेक्सने एकाच दिवसात 319 अंकांची सर्वाधिक कमाई केली आहे. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक 90.70 अंकांनी वाढून 7367.10 अंकांच्या नव्या विक्रमी पातळीवर बंद झाला. त्या अगोदर 22 मे रोजी निफ्टीने 7,276.40 अंकांची विक्रमी पातळी गाठली होती. सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या स्टेट बॅँकेने तिमाहीमध्ये चांगली आर्थिक कामगिरी केल्याचा बाजारावर सकारात्मक परिणाम झाल्याचे मत एंजेल ब्रोकिंगने व्यक्त केले.