आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Share Market News In Marathi, Narendra Modi, Prime Minister, Divya Marathi

बाजारात ‘खरेदीकाला’; सेन्सेक्स, निफ्टीचा ऐतिहासिक ‘थर’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या प्रभावी भाषणामुळे बाजारात उत्साहाचे वारे संचारले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात तमाम गोविंदा दहीहंडीचा आनंद लुटत असतानाच दुस-या बाजूला मुंंबई आणि राष्‍ट्रीय बाजारात गुंतवणूकदारांनी खरेदीकाल्याचा भरपूर आनंद लुटला. इतकेच नाहीतर सेन्सेक्स आणि निफ्टीची हंडी नव्या ऐतिहासिक थरावर गेली.

पंतप्रधान मोदी यांनी 15 ऑगस्टला पायाभूत आणि उत्पादन क्षेत्राला बळकटी देण्यासाठी ठोस पावले उचलण्याबाबत काढलेले आश्वासक उद्गार बाजाराला मोठी उभारी देणारे ठरले. त्यातच जूनअखेर संपलेल्या पहिल्या तिमाहीत काही बड्या कंपन्यांनी केलेली लक्षणीय आर्थिक कामगिरी, जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरण यामुळेदेखील गुंतवणूकदार गोविंदा उत्साहात होते.
सकाळच्या सत्रात सेन्सेक्स काहीसा खालच्या पातळीवर फिरत होता. परंतु नंतर मात्र बाजारात झालेल्या खरेदीकाल्यामध्ये सेन्सेक्सने मधल्या सत्रातच 26,413.11 अकांची कमाल पातळी गाठली. विशेष म्हणजे या अगोदर 25 जुलैला 26.300.17 अंकांच्या कमाल थरावर कडी करीत सेन्सेक्सने दहीहंडीच्या दिवशी आणखी एक नवा थर लावला. सार्वजनिक कंपन्या, तेल आणि वायू, भांडवली वस्तू, बॅँक, पायाभूत, ग्राहकोपयोगी वस्तू, वाहन आणि धातू क्षेत्रातील समभागांचा ‘काला’ गुंतवणूकदारांनी फस्त केला. थरांवर थर लावत सेन्सेक्स दिवसअखेर 287.73 अंकांची हंडी फोडून 26,390.96 अंकांच्या विक्रमी थरावर बंद झाला. या अगोदर 24 जुलैला सेन्सेक्सने 26,271.85 अंकांच्या विक्रमी थराची नोंद केली होती. आयसीआयसीआय बॅँक, ओएनजीसी, टाटा मोटर्स, अ‍ॅक्सिस बॅँक, सिप्ला, भेल या प्रमुख समभागांमुळे सेन्सेक्सचा विक्रमी थर दिवसअखेरपर्यंत भक्कम स्थितीत राहू शकला. राष्‍ट्रीय शेअर बाजारातील खरेदीच्या हंडीत निफ्टीनेही पहिल्यांदाच 7,800 अंकांचा विक्रमी थर लावून सगळ्यांना धक्का दिला. निफ्टीची हंडी 82.55 अंकांनी फुटली पण निफ्टीने 7874,25 अंकांच्या नव्या विक्रमी थराची नोंद करीत निफ्टीने 24 जुलैच्या अगोदरच 7830.60 अंकांच्या विक्रमी थराला मागे टाकले.

क्षेत्रीय निर्देशांक चमकले
मुंबई शेअर बाजारातील 12 क्षेत्रीय निर्देशांकांपैकी 10 निर्देशांक चमकले. तेल आणि वायू, बँकिंग, भांडवली वस्तू, ऊर्जा आणि धातू निर्देशांकांत 0.26 ते 2.64 टक्के वाढ दिसून आली. पाच सत्रात सेन्सेक्सने 1060 अंकांच्या वाढीची नोंद केली आहे.

तेजीचे मानकरी
ओएनजीसी, सिप्ला, अ‍ॅक्सिस बँक, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल. एसबीआय, एल अँड टी, हिंदाल्को, कोल इंडिया, हिंदुस्तान युनिलिव्हर, मारुती सुझुकी, टाटा पॉवर, सेसा स्टरलाइट, रिलायन्स इंडस्ट्रीज.

मोदी इफेक्ट
पायाभूत आणि उत्पादन क्षेत्राला बळकटी देण्याबरोबरच सर्वोत्तम प्रशासनाची गरज असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या भाषणात नमूद केल्यामुळे बाजारात तेजीची लाट आल्याचे मत बोनान्झा पोर्टफोलिओचे वरिष्ठ संशोधक विश्लेषक निधी सारस्वत यांनी व्यक्त केले.