आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - चालू खात्यातील तुटीमध्ये लक्षणीय घट झाल्याने केंद्र सरकारबरोबरच भांडवल बाजारालाही मोठा दिलासा मिळाला. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी केलेल्या दणकून खरेदीत बँक, तेल आणि वायू तसेच धातू समभागांना मागणी येऊन सेन्सेक्समध्ये 237 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्स 21,513.87 अंकांच्या नव्या विक्रमी पातळीवर पोहोचला. निफ्टीच्या निर्देशांकानेही विक्रमी झेप घेतली. लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने बाजारात सध्या निवडणुकांपूर्वीचे तेजीचे वारे वाहत आहेत.
बाजारात आलेल्या खरेदीच्या झंझावातामध्ये आयसीआयसीआय बँक, रिलायन्स, एल अँड टी यांच्यासह 24 समभागांनी चांगली कमाई केली; पण त्यातही हिंदाल्को आणि भेलच्या समभागांना जास्त मागणी आली. परिणामी सेन्सेक्सने 23 जानेवारीचा अगोदरचा 21,373.66 अंकांच्या अत्युच्च पातळीचा विक्रम मोडत 21,525.14 अंकांची नवी विक्रमी पातळी नोंदवली. गेल्या तीन दिवसांत सेन्सेक्समध्ये 567.22 अंकांची वाढ झाली आहे. सेन्सेक्सच्या बरोबरीने निफ्टीमध्येदेखील 72.50 अंकांची वाढ होऊन तो 6401.15 अंकांच्या कमाल पातळीवर बंद झाला. निफ्टीने 9डिसेंबरचा अगोदरचा 6363.90 अंकांचा विक्रम मोडून काढला.
निर्यातीमध्ये झालेली चांगली वाढ आणि सोन्याच्या आयातीत झालेली घट यामुळे डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत चालू खात्यातील तूट जीडीपीच्या तुलनेत कमी होऊन 4.2 अब्ज डॉलरवर आल्याने मोठा आधार मिळाला आहे. मुख्य म्हणजे चालू खात्यातील तुटीचे प्रमाण घटल्यानंतर रुपयाला बळकटी मिळून विदेशी गुंतवणूकदार संस्थांची भारतीय समभागांच्या खरेदीत वाढ होण्याच्या आशा बाजारामध्ये निर्माण झाल्या आहेत.
शेअर बाजाराचे कामकाज संपले त्या वेळी रुपया डॉलरच्या तुलनेत 61.11 अशा वर्षातल्या कमाल पातळीवर सशक्त झाला. आशियाई शेअर बाजारातील सकारात्मक कल, युरोप शेअर बाजारातील तेजी याचादेखील बाजारावर सकारात्मक परिणाम झाला.
क्षेत्रीय निर्देशांकांचीही झेप : स्थावर मालमत्ता : 4.9 %, ऊर्जा 2.45 %, धातू : 2.23 %, तेल आणि वायू 2.23 %, आरोग्य - 2.23 %
तेजीचे मानकरी
हिंदाल्को, भेल, आयसीआयसीआय बँक, ओएनजीसी, टाटा स्टील, एनटीपीसी, गेल इंडिया, सेसा स्टर्लाइट, कोल इंडिया, हीरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो, रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती-सुझुकी, एल अँड टी, अॅक्सिस बँक, टाटा पॉवर
रुपयाचा तीन महिन्यांचा उच्चंक : चालू खात्यातील तूट कमी झाल्याने रुपयाला बळ आले आहे. डॉलरच्या तुलनेत गुरुवारी रुपया 64 पैशांनी वाढून 61.11 झाला. हा रुपयाचा तीन महिन्यांचा उच्चंक आहे.
एफआयआयची खरेदी पथ्यावर
भांडवल बाजारात विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून (एफआयआय) येत असलेला निधीचा मोठा ओघ, किरकोळ गुंतवणूकदारांचा वाढलेला सहभाग यामुळे बाजाराने मोठी झेप घेतली. बाजारात सध्या निवडणूकपूर्व तेजी दिसत असून त्याचे प्रतिबिंब बाजारात पडलेले बघायला मिळाल.
मोतीलाल ओस्वाल, एमडी, मोतीलाल ओस्वाल फायनान्शियल सर्व्हिसेस
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.