आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Share Market News In Marathi, Sensex, Divya Marathi

बाजारात तेजीला उधाण,सेन्सेक्स 263 अंकांनी वधारला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रशियाच्या लष्कराला युक्रेनच्या सीमेरेषेवरून परतण्याचा आदेश मिळाला आणि जगभरातील शेअर बाजारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. जागतिक शेअर बाजारात आलेल्या तेजीमुळे तणाव दूर झालेल्या गुंंतवणूकदारांनी केलेल्या तुफान खरेदीमध्ये सेन्सेक्सने गेल्या सात आठवड्यांतील सर्वोत्तम कमाई केली. केवळ मुंबई शेअर बाजारच नाही, तर उगवत्या बाजारपेठेतील शेअर बाजारांमध्येदेखील तेजी आली.


युक्रेन - रशियामधील तणाव निवळण्याबरोबरच विदेशी गुंतवणूकदारांनी सातत्याने खरेदीचा सपाटा सुरू ठेवला आहे. शेअर बाजाराकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार या गुंतवणूकदारांनी सोमवारी 198.53 कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली आहे. युरोप आणि अमेरिकेतील शेअर बाजारात आलेली तेजी या सगळ्या सकारात्मक घडामोडींमुळे बाजारात खरेदीचा उत्साह दुणावला होता.


सेन्सेक्स सकाळी स्थिर पातळीवर उघडला. उलट सकाळच्या सत्रानंतर त्यात आणखी सुधारणा होत गेली. दिवसअखेर सेन्सेक्स 263.08 अंकांनी वाढून 21,209.73 अंकांच्या पाच महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला. या अगोदर 31 जानेवारीला सेन्सेक्सने 375.72 अंकांची उसळी मारत चांगली कमाई केली होती. रशिया आणि युक्रेनमधील संभाव्य युद्धाच्या चिंतेमुळे सेन्सेक्स सोमवारी 173.47 अंकांनी गडगडला होता. राष्‍ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीनेदेखील पाच आठवड्यांनंतर 6300 अंकांची पातळी पार केली.


दिवसअखेर निफ्टीमध्ये 76.50 अंकांची वाढ होऊन तो 6297.95 अंकांच्या पातळीवर बंद झाला. बाजारात झालेल्या खरेदीत धातू, बँक, भांडवली वस्तू समभागांच्या किमतीत सुधारणा झाली; परंतु माहिती तंत्रज्ञान आणि आरोग्य क्षेत्रातील समभागांना मात्र फटका बसला. युद्धाचे सावट दूर झाल्यामुळे हाँगकाँग, जपान, मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया शेअर बाजारांत तेजी आली; परंतु चीन, तैवान, फिलिपाइन्स बाजार मात्र घसरले.


रुपयाला तरतरी : शेअर बाजारातील तेजीमुळे मंगळवारी रुपयाला बळ मिळाले. डॉलरच्या तुलनेत रुपयाने 19 पैशांची कमाई करत 61.85 ही पातळी गाठली. रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव निवळल्यानेही रुपयाला बळ मिळाले. विदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात समभाग खरेदी झाल्याने रुपयाची मागणी वाढली. घसरणा-या रुपयाला तरतरी आली.


टॉप गेनर्स
हिदाल्को, सेसा स्टर्लाइट, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक, गेल इंडिया, भेल, टाटा पॉवर, एनटीपीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, स्टेट बँक, ओएनजीसी, टाटा स्टील, एल अँड टी, रिलायन्स, एचडीएफसी, हीरो मोटोकॉर्प, कोल इंडिया, मारुती, आयटीसी.


टॉप लुझर्स
सन फार्मा, डॉ. रेड्डीज लॅब.
क्षेत्रीय निर्देशांकांची झेप
धातू : 3.31 %
बँक : 2.47 %
भांडवली वस्तू : 2 %
ग्राहकोपयोगी वस्तू : 1.95 %
तेल आणि वायू : 1.57 %
स्थावर मालमत्ता : 1.03 %