आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Share Market News In Marathi, Sensex, Divya Marathi

शेअर बाजार उभारणार 23 हजारी शिखराची गुढी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लोकसभा निवडणुकांनंतर केंद्रात स्थिर सरकार येण्याच्या अपेक्षेने भांडवल बाजारात गेल्या काही दिवसांपासून निवडणूकपूर्व तेजीच्या पताका फडकत आहेत. त्यातच विदेशी निधी संस्थांकडून मोठय़ा प्रमाणावर भांडवलाचा ओघ येत असून त्याबळावर नुकत्याच संपलेल्या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टीने पाडव्याअगोदरच विक्रमी गुढय़ा उभारल्या. मार्च- एप्रिलच्या पहिल्या आठवड्यानंतर बाजाराचा नेमका कल समजणार असून त्यानंतर सेन्सेक्स 23 हजार अंकांची सर्वात उंच गुढी उभारेल, असा अंदाज गुंतवणूकतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.


निवडणुकांपूर्वी बाजारात वाहत असलेल्या तेजीच्या वार्‍यांना विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून सातत्याने सुरू असलेल्या खरेदीचे बळ मिळाले आहे. मंगळवारी जाहीर होणार्‍या पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँक व्याजदरात कोणताही बदल करण्याची शक्यता नसल्यामुळे बाजाराच्या आनंदात आणखी भर पडली आहे. त्यामुळे बाजारात सार्वजनिक कंपन्या, ऊर्जा, बँका, भांडवली वस्तू, धातू, स्थावर मालमत्ता, रिफायनरी अशा सर्वच समभागांना खरेदीचे जबरदस्त पाठबळ मिळाले आहे. डॉलरच्या तुलनेत सशक्त झालेल्या रुपयाचाही सकारात्मक परिणाम झाला आहे.
मे महिन्यात होणार्‍या लोकसभा निवडणुकांचे निकाल बाजाराला पुढची दिशा देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत भांडवल बाजारातील बहुतांश तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळातील भांडवल बाजाराचा कल कसा राहील याबाबत ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्हेंच्युरा सिक्युरिटीज लिमिटेडचे सबब्रोकर केदार ओक यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत स्थिर सरकार येण्याचे संकेत मिळाल्यास सेन्सेक्स चटकन दीड हजाराने वर जाईल. पण ती बाजारातून बाहेर पडण्याची तेजी (एक्झिट रॅली) असेल. त्रिशंकू अवस्था निर्माण झाली तर बाजारातील सध्याचेच वातावरण त्या वेळी असेल . मार्च- एप्रिलच्या पहिल्या आठवड्यानंतर बाजाराचा नेमका कल समजणार असून स्थिर सरकार येण्याच्या दिशेने वाटचाल सुरू राहिल्यास सेन्सेक्स 23 हजार अंकांचे नवे शिखर गाठण्याचा अंदाज आहे.


अर्थव्यवस्थेची सुधारणांच्या दिशेने सुरू झालेली वाटचाल, महागाईतील घट, रिझर्व्ह बॅँकेने केलेल्या विविध उपाययोजनांचा दिसू लागलेला दृश्य प्रभाव याचा बाजारावर सकारात्मक परिणाम होत आहे. मंगळवार, एक एप्रिल रोजी रिझर्व्ह बॅँक पहिल्यांदा मासिक नाणेनिधी धोरण जाहीर करणार आहे. या धोरणामध्ये अर्थव्यवस्था कितपत नियंत्रणात आली हे कळणार आहे. त्यावरूनही बाजाराचा पुढचा कल नेमका कळणार आहे. याच आठवड्यात नवीन बँक परवाने जाहीर झाल्यास बँक समभागांमध्ये करेक्शन येण्याची शक्यता आहे.


गुंतवणूकदारांनी काय करावे
सेन्सेक्सच्या सध्याच्या भरारीचा फायदा उचलून गुंतवणूकदारांनी नफा पदरात पाडून घ्यावा. अलीकडे किंमत घसरलेले समभाग खरेदी करायला हरकत नाही. त्याचप्रमाणे चांगले भवितव्य असलेल्या कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूक करावी. परंतु ही गुंतवणूक अल्पमुदतीसाठी न करता दीर्घकालीन धोरण डोळ्यासमोर ठेवून करावी. नवीन गुंतवणूकदारांनीदेखील अल्पमुदतीचा लाभ बघू नये, उलट खरेदी नियंत्रणात ठेवून व्यवहार करावे.


तीन जानेवारीच्या अंकातच व्यक्त केलेला अंदाज : भांडवल बाजारात 2003 मध्ये ज्याप्रमाणे तेजीला सुरुवात झाली होती, अगदी त्याचप्रमाणे 2013 मध्ये तेजीला सुरुवात झाली असून 2017 मध्ये ही तेजी कमाल पातळीवर जाण्याची शक्यता आहे. परंतु पुढच्या सहा महिन्यांतील घडामोडींवरच बाजाराच्या हालचाली अवलंबून राहणार आहेत. लोकसभा निवडणुकांनंतर केंद्रात स्थिर सरकार यावे अशीच बाजाराची अपेक्षा आहे. तसे झाल्यास सेन्सेक्स 23500 ते 24000 अंकांपर्यंत झेप घेऊ शकेल, असा अंदाज ‘दिव्य मराठी’च्या तीन जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तात अगोदरच व्यक्त केलेला होता.